कालव्यात पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू
By admin | Published: April 27, 2017 04:48 AM2017-04-27T04:48:54+5:302017-04-27T04:48:54+5:30
रावडी व चिखलगावच्या सीमेवर धोमबलकवडी धरणाच्या कालव्यात पडून पाण्याच्या प्रवाहाबरोबर शुभम वानखेडे (वय १४, रा. मांढरदेवी, ता. वाई) मुलगा
भोर : रावडी व चिखलगावच्या सीमेवर धोमबलकवडी धरणाच्या कालव्यात पडून पाण्याच्या प्रवाहाबरोबर शुभम वानखेडे (वय १४, रा. मांढरदेवी, ता. वाई) मुलगा वाहत जाऊन मृत्युमुखी पडल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. सुमारे ४ किलोमीटर अंतरावर कर्नावड बोगद्याजवळ त्याचा मृतदेह सापडला आहे.
सुभाष चिखलगाव येथील त्याचा मामा खंडू गायकवाड यांच्याकडे लग्नानिमित्त आला होता. कालव्याजवळ शुभम व त्याचा भाऊ खेळत असताना तो पाण्यात पडला.
कालव्याला पाणी सोडल्यामुळे पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने तो पाण्याबरोबर वाहत जात असताना त्याच्या भावाने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही.
शुभम यापूर्वी मामाच्या गावाला चिखलगावला शाळेत शिकण्यासाठी होता. मात्र सध्या तो मांढरदेवी येथे राहत होता.
विद्यार्थ्यांसाठी धोकादायक
रावडी व चिखलगाव गावाजवळच्या सीमेवर प्राथमिक शाळा व अंगणवाडी केंद्रातील मिळून ४२ मुले शिक्षण घेत आहेत. मात्र अरुंद आणि वळणाचा रस्ता असून एका बाजूला ओढा आणि दुसऱ्या बाजूला कालवा आहे. शाळेपासून अवघ्या ७० फुटांवर व माध्यमिक शाळेपासून ६० फुटांवर कालवा असल्याने लहान मुलांना धोकादायक आहे.
यापूर्वीही एक जण पडून मृत्युमुखी पडला आहे. यामुळे
संरक्षक भिंत किंवा तारेचे कंपाऊंड करण्याची मागणी रावडीचे
उपसरंपच मोहन बांदल यांनी कार्यकारी अभियंता धोमबलकवडी यांच्याकडे केली आहे. मात्र अद्याप काहीच कार्यवाही झाली नाही. कदाचित भिंत असती तर मुलाचे प्राण वाचले असते, असे मोहन बांदल यांनी सांगितले. (वार्ताहर)