विद्यार्थ्यांनो; गोंधळून जाऊ नका; परीक्षेच्या माहितीसाठी महाविद्यालयांशी साधा संपर्क : प्राचार्य महासंघ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 05:47 PM2020-04-16T17:47:28+5:302020-04-16T17:54:50+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील व महाराष्ट्रातील विद्यापीठ व महाविद्यालयांना सुट्टी
पुणे: महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाइन घेतल्या जातील, बहुपर्यायी प्रश्नांवर (एमसीक्यू )घेतल्या जातील, अशा कोणत्याही गोष्टींवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, तसेच गोंधळून जाऊ नये, परीक्षेबाबतच्या माहितीसाठी महाविद्यालयांची संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य महासंघातर्फे करण्यात आले आहे.
प्राचार्य महासंघाच्या वतीने पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर ,गडचिरोली ,नागपूर जळगाव ,मुंबई आदी जिल्ह्यांसह कोकण, मराठवाडा व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधील प्राचार्यांची बैठक गुरुवारी 'झूम'अॅप द्वारे घेण्यात आली. त्यात 100 हून अधिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सहभाग नोंदवला.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व प्राचार्य डॉ. संजय चाकणे,डॉ. सुधाकर जाधवर, प्राचार्य महासंघाचे प्रा. नंदकुमार निकम, ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अरुण अडसूळ यांनी या चर्चेमध्ये मनोगत व्यक्त केले.परीक्षांबरोबरच काही प्रशासकीय बाबींवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील व महाराष्ट्रातील विद्यापीठ व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. मात्र, यूजीसी व राज्य शासनाने परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल अद्याप तयार झालेला नाही. मात्र, तरीही महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन किंवा बहुपर्यायी प्रश्नांवर आधारित घेतल्या जातील, अशा अफवा सोशल मीडियावर पसरल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेच्या माहितीसाठी केवळ महाविद्यालयातील परीक्षा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन या बैठकीच्या माध्यमातून झालेल्या चर्चेद्वारे करण्यात आले आहे.
--------------
राज्यातील विद्यापीठांचा अभ्यासक्रम आणि शिकवण्याची पद्धती ऑनलाइन परीक्षेची सुसंगत नाही.तसेच महाविद्यालयांना ऑनलाइन परीक्षा घेणे शक्य नाही. राज्यातील सुमारे चाळीस ते पन्नास लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा यूजीसी, विद्यापीठ किंवा राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निदेर्शानुसार घेतल्या जातील. विद्यार्थ्यांनी त्यासाठी आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापकांची संपर्क साधावा. तसेच महाविद्यालयातील महत्त्वाच्या कामासाठी प्राचार्य आणि काही कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने पास देण्याची गरज आहे.
प्रा. नंदकुमार निकम, प्राचार्य महासंघ.
------------
विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश देणे संयुक्तिक होणार नाही. त्यामुळे लॉकडाऊन संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊन त्यांचा निकाल जाहीर करावा.शैक्षणिक वर्ष काही दिवस उशिरा सुरू झाले. तरी खूप मोठा फरक पडणार नाही .- डॉ.अरुण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ
-----------
प्रत्येक महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर परीक्षा विभागातील प्राध्यापकांचे दूरध्वनी क्रमांक प्रसिद्ध केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदभार्तील माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
- डॉ.संजय चाकणे, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ