पुण्यात शाळेची फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना काढलं बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 11:35 AM2021-10-04T11:35:08+5:302021-10-04T11:36:45+5:30
पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या ज्ञानगंगा शाळेत मागच्या वर्षीची फी भरली नाही म्हणून शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना शाळेबाहेरच उभं केलं
पुणे: कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर तब्बल दीड वर्षांनंतर आजपासून राज्यभरातील शाळा आज सुरू होत असताना विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात आहे. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन, पेढा भरवून , औक्षण करून तर कुठे फुलांची उधळण करून विद्यार्थ्यांचे शाळांमध्ये स्वागत करण्यात आले. परंतु असं असलं तरीही पुण्यातील एका शाळेतून मात्र एक वेगळा प्रकार उघडकीस आला आहे. मागच्या वर्षीची फी भरली नाही म्हणून काही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारण्यात आला आहे.
पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या ज्ञानगंगा शाळेत मागच्या वर्षीची फी भरली नाही म्हणून शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना शाळेबाहेरच उभं केलं. आपल्या पाल्यांना शाळेत सोडण्यासाठी आलेल्या पालकांना मात्र शाळेच्या या पावित्र्याने धक्का बसला. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी झगडणाऱ्या पालकांनी शाळेच्या या निर्णयाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर पालकांच्या एकजुटीनंतर शाळा प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला.
या सर्व प्रकारानंतर फी वसुलीचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. फी वसूल करण्यासाठी शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना ओलीस ठेवणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न पालकांकडून विचारला जातोय. याबाबत आमच्या लोकमत प्रतिनिधीने संस्थाचालक संभाजी काटकर यांच्याशी संपर्क साधला असता, गेल्या वर्षीची फी भरण्याची विनंती आम्ही पालकांना केली होती. मात्र कोणत्याही विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढले नाही. त्यावर काही पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेबाहेर ठेवल्याचा आरोप आमच्या संस्थेवर केला आहे. वास्तविक पाहता ती भरलेले असो अथवा नसो आम्ही कोणत्याही विद्यार्थ्यांना शाळेत येण्यापासून रोखले नाही, अशी माहिती काटकर यांनी दिली