विद्यार्थ्यांनी अनुभवला चार राज्यांच्या संस्कृतीचा मिलाफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 02:11 AM2018-12-21T02:11:37+5:302018-12-21T02:11:57+5:30
आंतरविद्यापीठ युवा महोत्सव : विविध स्पर्धांना जल्लोषात सुरुवात
पुणे : डोळ्यांची पारणं फेडणारी पारंपरिक लोकनृत्ये, खिळवून ठेवणाऱ्या एकांकिका, तृप्त करणारे शास्त्रीय व पाश्चात्त्य गायन, वादविवाद स्पर्धा, स्पॉट फोटोग्राफी, प्रश्नमंजुषा आदी कलाप्रकार गुजरात, महाराष्टÑ, राजस्थान व गोवा राज्यांतील विद्यापीठांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी सादर केले. यामधून ते त्यांच्या राज्याच्या संस्कृतीवर प्रकाश टाकत असल्याने चार राज्यांमधील संस्कृतीचा मिलाफ विद्यार्थ्यांनी अनुभवला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या ‘युवा स्पंदन’ आंतरविद्यापीठ महोत्सवामध्ये पहिला दिवस जल्लोषाचा ठरला. दोन सत्रांमध्ये रंगलेल्या स्पर्धांमध्ये स्पर्धकांचा सळसळता उत्साह पाहायला मिळाला. त्याला प्रेक्षकांकडूनही उदंड प्रतिसाद मिळाला.
मुख्य मंडपामध्ये सकाळी दहा वाजल्यापासून पारंपरिक नृत्य स्पर्धेला सुरुवात झाली. युवा महोत्सवामधील ही स्पर्धा सर्वाधिक आर्कषणाचे केंद्र होती. सभामंडपामध्ये सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. एसएनडीटी विद्यापीठाच्या मुलींनी डोक्यावर
समई घेऊन अत्यंत सुंदर नृत्य सादर केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने कोळी नृत्य सादर केले. यजमान संघाला प्रेक्षकांमधून मोठा प्रतिसाद मिळाला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने गोंधळी नृत्य सादर केले. मुंबई विद्यापीठाकडून पंढरीची वारी साकारण्यात आली. मारवाड विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ यांनी त्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी लोकनृत्ये सादर केली. पारंपरिक लोकनृत्य स्पर्धेदरम्यान केवळ स्पर्धकच नव्हे, तर उपस्थित प्रेक्षकांनीही पारंपरिक नृत्यांचा आनंद लुटला.
या स्पर्धेमध्ये बहुतांश संघांनी आपापल्या राज्यांच्या पारंपरिक लोकनृत्यांवर भर दिल्याचे दिसून आले. पारंपरिक वेशभूषांनी नटलेले स्पर्धक विद्यापीठातून वावरताना भारताच्या विविधतेचे दर्शन होत होते.
लालन सारंग नाट्यमंचावर आयोजित एकांकिका स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संघांनी विविध सामाजिक समस्यांवर कलात्मक पद्धतीने सादरीकरण केले.
कॉमर्स भवनातील आचार्य प्र. के. अत्रे सभामंचावर झालेल्या प्रश्नमंजूषेच्या प्राथमिक फेरीदरम्यान अनेक प्रश्नांनी स्पर्धकांना कोड्यात टाकल्याचे दिसून आले. प्रश्नमंजूषेसाठी खूपच चिकित्सक पद्धतीने प्रश्न निवडल्याच्या प्रतिक्रिया स्पर्धकांनी नोंदविल्या.
प्रश्नमंजुषेच्या अंतिम फेरीसाठी ८ संघ
४प्रश्नमंजुषेच्या प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी ८ विद्यापीठांच्या संघाची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये मुंबई विद्यापीठ, महाराजा सयाजीराव विद्यापीठ वडोदरा (गुजरात), सरदार पटेल विद्यापीठ, आनंद (गुजरात), बनस्थली विद्यापीठ (राजस्थान), गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद (गुजरात) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे या विद्यापीठांचा समावेश आहे.
समई नृत्याने
प्रेक्षक मंत्रमुग्ध
४एसएनडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी डोक्यावर पेटती समई घेऊन बहारदार नृत्य सादर केले. डोक्यावरची समई थोडीशीही हलू न देता त्यांनी नृत्य सादर केले. डोक्यावर एक समई असताना पुन्हा खाली वाकून तोंडाने दुसरी समई उचलण्याची अदा त्यांनी पेश केली, तेव्हा सारे सभागृह स्तब्ध झाले.
लोकनृत्यांवर
महाराष्टÑाचा ठसा
४एसएनडीटी विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ यांनी एकापेक्षा एक सरस लोकनृत्ये सादर करून स्पर्धेवर महाराष्टÑाचा ठसा उमटवला. ही लोकनृत्ये सादर होत असताना मुख्य सभामंडपातील विद्यार्थी, प्रेक्षकांनीही गाण्यांवर ताल धरला. टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस मंडपामध्ये पडला.