विद्यार्थ्यांनी अनुभवले रात्रीच्या आसमंतातील तारांगण

By admin | Published: December 31, 2016 05:24 AM2016-12-31T05:24:45+5:302016-12-31T05:24:45+5:30

येथे आयोजित २४ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसमध्ये आज विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने प्रदर्शन व तेथे असलेल्या अनेक उपक्रमांचा आनंद लुटला.

Students experience a night sky in the night sky | विद्यार्थ्यांनी अनुभवले रात्रीच्या आसमंतातील तारांगण

विद्यार्थ्यांनी अनुभवले रात्रीच्या आसमंतातील तारांगण

Next

बारामती : येथे आयोजित २४ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसमध्ये आज विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने प्रदर्शन व तेथे असलेल्या अनेक उपक्रमांचा आनंद लुटला. शुक्रवारी या प्रदर्शनासाठी मोठी गर्दी उसळली होती. विद्यार्थ्यांनी येथे रात्रीच्या आसमंताचा आभास निर्माण करून केलेले तारांगण अनुभवले. शिवाय भौतिकशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, वन्यजीवन, विज्ञान, रोबोट आदी प्रदर्शनाचे आकर्षण ठरले.
सकाळी नऊपासूनच विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहण्यासाठी रांगा लावल्या होत्या. या प्रदर्शनातील फिल्म शोमध्ये दाखवल्या जाणाऱ्या विविध निसर्गविषयक, तसेच विज्ञानाशी संबंधित अनेक चित्रफिती पाहून मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. भव्य पडद्यावर वन्यजीव व विज्ञानाशी संबंधित या चित्रफिती अनेक मुलांनी प्रथमच पाहिल्या.
या शिवाय तारांगणामध्ये मुलांना खगोलशास्त्राची सविस्तर माहिती दिली जात होती. एका काळ्या डोममध्ये विद्यार्थ्यांना नेऊन तेथे रात्रीच्या आसमंताचा आभास निर्माण केलेले तारांगण विद्यार्थ्यांनी अनुभवले. विविध ग्रह व ताऱ्यांसह खगोलशास्त्राबाबत या वेळी मुलांना अनेक नवीन गोष्टींची माहिती दिली गेली.
मनोरंजनातून भौतिकशास्त्र व गणित यांचीही माहिती या प्रदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनी घेतली. विविध प्रकारच्या कृती कशा करायच्या, हेही या वेळी मुलांना सांगितले जात होते.
विद्या प्रतिष्ठान सी.बी.एस.ई. शाळेच्या वतीने मुलांना रोबोटीक्सची माहिती देण्यात आली. मुलांनी बारामतीच्या प्रयोगशाळेत तयार केलेले रोबोटीक्स विविध कामे कशी करतात याचा अनुभव घेतला. याबाबत विद्यार्थ्यांकडून दिली जात असलेली माहिती पाहून मुले हरखून गेली.
मुलांसह पालकांनीदेखील या उपक्रमाची प्रशंसा केली. अनेक पालक आपल्या मुलांना रोबोटीक्स दाखविण्यासाठी आवर्जून घेऊन आल्याचे आज दिसले. (वार्ताहर)

मुलांनी साधला संवाद
विविध तालुक्यांतून आलेल्या मुलांनी आज या बाल विज्ञान काँग्रेससाठी परराज्यांतून आलेल्या मुलांशी विद्या प्रतिष्ठान संकुलात संवाद साधला. कोणत्या राज्यातून ते आले आहेत, कोणते प्रयोग त्यांनी सादर केलेले आहेत, त्यांना महाराष्ट्राविषयी काय वाटले, याबाबत मुलांनी त्यांच्याशी चर्चा केली. विद्या प्रतिष्ठानच्या संकुलात विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती. मात्र, उत्साही मुलांनी या मुलांशी या गर्दीतही संवाद साधला.

थालिपीठ, बिर्याणीचा आस्वाद...
विज्ञान प्रदर्शनात मुलांनी खाऊगल्लीतील खाद्यपदार्थांवर मनसोक्त ताव मारला. भेळ, पाणीपुरी, वडापाव, थालिपीठ, शाकाहारी बिर्याणी, ज्यूस व आइस्क्रीमचा आस्वाद मुलांनी घेतला. त्याच्या शेजारी असलेल्या जत्रेतही जात मुलांनी पाळणे व इतर खेळण्यात बसत त्याचाही आनंद मनमुराद लुटला. या प्रदर्शनाला भेट दिल्याचा वेगळाच आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

प्रत्यक्षात शस्त्रे पाहून हरखून गेली मुले
पुणे ग्रामीण पोलिसांच्या वतीने २४ व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसमध्ये आयुध प्रदर्शन आयोजित केले गेले. या दालनात पोलिसांच्या वापरातील विविध प्रकारची शस्त्रे ठेवण्यात आलेली आहेत. इतर वेळी छायाचित्र, चित्रपटात पाहिलेली पोलिसांची शस्त्रे पाहून मुले हरखून गेली.

Web Title: Students experience a night sky in the night sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.