विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल
By admin | Published: May 25, 2017 02:43 AM2017-05-25T02:43:49+5:302017-05-25T02:44:09+5:30
परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, ज्या महाविद्यालयातून या प्रश्नपत्रिका बाहेर आल्या आहेत, त्यांना विद्यापीठाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
़विद्यापीठाची सध्या अभियांत्रिकी शाखेची परीक्षा सुरू आहे. विद्यापीठाकडून परीक्षेपूर्वी तासभर आधी परीक्षा केंद्रांना ई-मेलद्वारे प्रश्नपत्रिका पाठविली जाते. त्यानंतर त्याची प्रिंट घेऊन विद्यार्थ्यांना त्याचे वाटप होते. मात्र, प्रश्नपत्रिकेची प्रिंट आऊट घेतल्यानंतर त्याचे मोबाईलवर फोटो काढून ते व्हॉट्सअॅप द्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले जात असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यापूर्वीही अभियांत्रिकीच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याचे प्रकार घडले आहेत. मागील आठवडाभरातही अहमदनगर जिल्ह्यातील व आकुर्डी येथील एका महाविद्यालयातून प्रश्नपत्रिका मोबाईलवर आल्याचे प्रकार समोर आला आहे. या दोन महाविद्यालयांमधून प्रश्नपत्रिकांचे फोटो काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्या.
पुणे शहरातील व वाघोली येथील परीक्षा केंद्रांवरील विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर मेकॅनिक्स व गणित विषयाच्या प्रश्नपत्रिका आढळून आल्या आहेत. याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ज्या महाविद्यालयांतून प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्या आहेत, त्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून योग्य तो खुलासा न आल्यास या महाविद्यालयांची परीक्षा केंद्रांची मान्यता काढून घेण्यात येईल. अशी कारवाई झाल्याशिवाय पेपरफुटीचे प्रकार थांबणार नाहीत, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
‘नीट’ परीक्षेप्रमाणे बंधने : कुलगुरू
पेपरफुटी रोखण्यासाठी तासभर आधी प्रश्नपत्रिका ई-मेलद्वारे केंद्रांवर पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच त्यावर विद्यापीठाचे वॉटर मार्किंग, सेंटर कोड, महाविद्यालयाचे नावही दिले जाते. तरीही असे प्रकार होत आहेत. परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकेची प्रिंट काढून कोणी तरी त्याचे मोबाईलवर फोटो काढून विद्यार्थ्यांना देत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता हे प्रकार रोखण्यासाठी विविध पर्यायांवर विचार सुरू आहे. ‘नीट’ परीक्षेसाठी काही बंधने घालण्यात आली होती. या परीक्षेप्रमाणे काही बंधने घालण्याचाही विचार केला जाऊ शकतो. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर ३० किंवा ४५ मिनिटे आधी येण्याचे बंधन घालून त्या वेळेतच प्रश्नपत्रिका ई-मेल करण्याबाबतही विचार सुरू आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षेच्या आधी प्रश्नपत्रिका पोहोचणार नाहीत. तसेच, या प्रक्रियेचा बाहेरील संस्थेकडून अभ्यास केल्यास त्यातील त्रुटी व आवश्यक सुधारणा करण्याबाबत पर्याय समोर येतील. तसेच, काही कॉलेजमध्ये आॅनलाईन परीक्षाही घेतल्या जातात. अशा विविध पर्यायांवर विचार केला जाईल, असे कुलगुरू डॉ. करमळकर यांनी स्पष्ट केले.