HSC & SSC Exam: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा; दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
By प्रशांत बिडवे | Published: November 1, 2023 06:40 PM2023-11-01T18:40:22+5:302023-11-01T21:06:20+5:30
बारावीच्या परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत तर इयत्ता दहावीची परीक्षा दि. १ ते २६ मार्च कालावधीत हाेणार
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार इयत्ता बारावीच्या परीक्षा दि. २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत तर इयत्ता दहावीची परीक्षा दि. १ ते २६ मार्च कालावधीत हाेणार आहे. याबाबत सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर दि. २ नाेव्हेंबर राेजी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेतली जाणार आहे. इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दि. १० ते २९ फेब्रुवारी तर इयत्ता बारावीची परीक्षा दि. २ ते २० फेब्रुवारी दरम्यान घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahasscboard.in या संकेतस्थळावर गुरूवार दि. २ नाेव्हेंबर पासून वेळापत्रक पाहता येणार आहे. संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरुपात परिक्षेचे वेळापत्रक देण्यात येणार असून ते अंतिम असल्याचे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
समाजमाध्यमावरील वेळापत्रक ग्राह्य धरू नका
छापील वेळापत्रकानुसार परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेला यावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून प्रसिद्ध झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, असे आवाहन मंडळामार्फत करण्यात आले आहे.
दहावी-बारावी लेखी परीक्षांचे वेळापत्रक
इयत्ता बारावी सर्वसाधारण, व्यवसाय व द्विलक्षी अभ्यासक्रम - दि. २१ फेब्रुवारी ते १९ मार्च
माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाईन परीक्षा (इ. बारावी) - दि. २० मार्च ते २३ मार्च
इयत्ता दहावी - दि. १ मार्च ते २६ मार्च