शाळांत विद्यार्थी हरित सेना
By Admin | Published: March 27, 2017 03:29 AM2017-03-27T03:29:36+5:302017-03-27T03:29:36+5:30
राष्ट्रीय हरित सेना या कार्यक्रमांतर्गत अस्तित्वातील शाळांमधील इको क्लबचे बळकटीकरण करण्यासाठी राज्यातील
पुणे : राष्ट्रीय हरित सेना या कार्यक्रमांतर्गत अस्तित्वातील शाळांमधील इको क्लबचे बळकटीकरण करण्यासाठी राज्यातील ८८०७ शाळांमध्ये विद्यार्थी हरित सेना निर्माण केली जाणार असून, या शाळांमधील इको क्लबसाठी प्रतिशाळा २५०० रुपयांप्रमाणे २ कोटी २० लाख १७ हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
पर्यावरणाचे रक्षण आणि सुरक्षितता हे आव्हान असून, बहुतेक समस्यांचे मूळ पर्यावरणविषयक प्रवृत्तींमध्येच दडलेले आहे. लहान मुले संस्कारक्षम असून त्यांच्यामध्ये पर्यावरणविषयक गोडी व जागरूकता निर्माण व्हावी यासाठी राज्य शासनातर्फे काही उपक्रम राबविले जातात. जानेवारी २००७ पासून या योजनेत अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम शिक्षक व विद्यार्थी यांच्या सहभागातून राबविण्यात आले.
पर्यावरणाच्या सद्यस्थितीबाबत विविध उपक्रमांद्वारे अद्ययावत माहिती देणे, पर्यावरण संवर्धनाच्या कामात मुलांना प्रत्यक्ष सहभागी करून घेणे, त्यांच्या माध्यमातून सामान्यांमध्ये जनजागृती करणे, लोकसहभाग वाढविणे ही या योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत. पर्यावरणाच्या प्रश्नांची जाण असलेली संवेदनशील नवी पिढी तयार करण्याचे महत्त्वाचे काम या योजनेत करण्यात येत आहे.
याच कार्यक्रमाचा भाग म्हणून राज्यात केंद्र शासनातर्फे मिळणाऱ्या सहायक अनुदानातून राष्ट्रीय हरित सेना योजना प्रत्येक जिल्ह्यातील २५० शाळांमधून राबविली जाते. त्यासाठी केंद्र शासनाकडून प्रतिशाळा २५०० रुपये अनुदान मिळत असते. हे अनुदान अत्यल्प असल्याने अन्य शाळांमध्ये ठोस कार्यक्रम घेण्यात अनुदानाची कमतरता भासत होती.
या शाळांमधील इको क्लबसाठी प्रतिशाळा २५०० रुपयांप्रमाणे २ कोटी २० लाख १७ हजार रुपये अनुदान दिले जाणार असून, पर्यावरणाच्या सद्यस्थितीबाबत विविध उपक्रमांद्वारे अद्ययावत माहिती देणे, पर्यावरण संवर्धनाच्या कामात मुलांना प्रत्यक्ष सहभागी करून घेणे, त्यांच्या माध्यमातून सामान्यांमध्ये जनजागृती करणे याबरोबरच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बीजसंकलन व पेरणी, रोपवाटिका निर्मिती, वृक्षलागवड, प्रदूषण नियंत्रण, ऊर्जा बचतीबाबत जागरूकता, पर्यावरणदिन व सणांचे औचित्य साधून जनजागृती करणे आदी उपक्रम राबविले जाणे शासनाला अभिप्रेत आहे. (प्रतिनिधी)