विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळ्यातून केले समाजप्रबोधन
By admin | Published: June 25, 2017 04:36 AM2017-06-25T04:36:22+5:302017-06-25T04:36:22+5:30
विठ्ठल विठ्ठल... विठ्ठला हरी ओम विठ्ठला, ज्ञानोबा तुकाराम व विठ्ठलनामाच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात, लेझीम व ढोल ताशा पथकासह राजेगाव
लोकमत न्यूज नेटवर्क
राजेगाव : विठ्ठल विठ्ठल... विठ्ठला हरी ओम विठ्ठला, ज्ञानोबा तुकाराम व विठ्ठलनामाच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात, लेझीम व ढोल ताशा पथकासह राजेगाव (ता. दौंड) येथील राजनाथ इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात दिंडी काढली.
या वेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून वृक्षतोड, स्री-भ्रूणहत्या, शेतकरी आत्महत्या या विषयांवर प्रबोधन केले.
संस्थेचे अध्यक्ष नवनाथ काळे आणि सचिव चंद्रकांत लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापिका मनाली दळवी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या वेळी राजनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल खैरे, गावातील ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक शहाजी मोघे, अमृता मांडे, अलिशा शेख, प्रमोद खंडागळे, राजेंद्र जाधव, रूपाली चोपडे,
ललिता कदम, स्नेहल राक्षे, सोनाली लोंढे, शैलेंद्र वाघमारे यांनी दिंडी सोहळा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
दिंडीत विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषेत व विद्यार्थिनी डोक्यावर तुळस घेऊन सहभागी झाल्या होत्या. भगवे ध्वज, टाळ हातात घेऊन बालवारकऱ्यांनी विठ्ठलनामाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, छत्रपती शिवाजीमहाराज, मुक्ताबाई व संत तुकारामांच्या वेशभूषा परिधान केलेले लहान विद्यार्थी दिंडीचे आकर्षण ठरले. विद्यार्थिनी व शिक्षिकांनी फुगड्यांचा आनंद लुटला.
दिंडीमध्ये झाडांचे रोप घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण व संवर्धनाचा संदेश दिला. गणपतीच्या मंदिरासमोर विद्यार्थ्यांनी केलेल्या रिंगण सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
राजनाथ इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका मनाली दळवी यांच्या हस्ते पालखीच्या पूजनाने दिंडीस
प्रारंभ करण्यात आला. दिंडीतील पालखीचे चौका-चौकात स्वागत करण्यात आले. लहान मुलांची दिंडी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
राजनाथ इंग्लिश स्कूल, तुकाराम मंदिर, राजेश्वर मंदिर, गणपती मंदिर येथून मार्गक्रमण करत शाळेच्या आवारात दिंडीचा समारोप झाला.