विद्यार्थ्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन दिले जावे
By admin | Published: February 22, 2017 03:16 AM2017-02-22T03:16:10+5:302017-02-22T03:16:10+5:30
देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संशोधनाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन
पुणे : देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी संशोधनाची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच आयआयटीसारख्या संस्थांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना संशोधनासाठी लागणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. संशोधन क्षेत्रात भारत आघाडीवर असल्याचे बोलले जात असले, तरी या क्षेत्रात अधिक काम करण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी व्यक्त केले.
अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान सल्लागार क्षेत्रातील केपीआयटी या कंपनीतर्फे ‘केपीआयटी स्पार्कल २०१७’ या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी जावडेकर बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि केपीआयटीच्या इनोव्हेटिव्ह समितीचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, नॉसकॉमचे माजी अध्यक्ष किरण कर्णिक, केपीआयटीचे सहसंस्थापक रवी पंडित आदी उपस्थित होते.
‘स्मार्ट सिटी’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित स्पर्धेत मंगलोर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंगच्या तसेच शिरपूर येथील आर. सी. पटेल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, बिरला इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स (बिटस्) पिलानी, भुवनेश्वर येथील कलिंगा इन्स्टिट्यूट आॅफ इंडस्ट्रिअल टेक्नॉलॉजी या महाविद्यालयांनी पारितोषिक पटकावले.
केपीआयटीचे सहसंस्थापक आणि समूह सीईओ रवी पंडित म्हणाले, की देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास करण्यासाठी स्मार्ट सिटींचा विकास अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आपली वाढणारी शहरी अर्थव्यवस्था शाश्वत करण्यासाठी तरुणांना नावीन्यपूर्ण डिझाइन तयार करण्याच्या संधी उपलब्ध करून देणार आहे.
(प्रतिनिधी)