दक्षिणी मराठी लोकांशी विद्यार्थ्यांचा संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 12:50 AM2018-07-09T00:50:12+5:302018-07-09T00:50:39+5:30
खेड तालुक्यातील भाम परिसरात असलेल्या जांभुळदरा शाळेत ‘दक्षिणी मराठी’ तसेच मायबोली मराठी व मराठी शाळेच्या प्रसार व प्रचारासाठी ‘प्रवास तंजावर मराठी’चा हा एक वेगळा उपक्रम सुरू आहे.
वाकी बुद्रुक - खेड तालुक्यातील भाम परिसरात असलेल्या जांभुळदरा शाळेत ‘दक्षिणी मराठी’ तसेच मायबोली मराठी व मराठी शाळेच्या प्रसार व प्रचारासाठी ‘प्रवास तंजावर मराठी’चा हा एक वेगळा उपक्रम सुरू आहे. आठवड्यातील प्रत्येक शनिवारी सकाळी शाळेतील एका वर्गात गुगल हँग आऊट या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चेन्नई, तमिळनाडू येथे कायमस्वरुपी वास्तव्यास असलेल्या मराठी भाषिकांशी संवाद साधतात.
विद्यार्र्थी कॅमेऱ्याद्वारेच प्रश्न विचारत होते. इ. ४ थीच्या परिसर अभ्यास विषयातील शिवछत्रपतींचा इतिहास त्यांना माहीत होता. मात्र, त्यांचे वंशज व्यंकोजीमहाराज व महाराष्ट्राच्या बाहेरही मराठी भाषिक बहुसंख्येने आहेत हे ऐकून, त्यांच्याशी बोलून आश्चर्य, तसेच अभिमानाची भावना विद्यार्थ्यांमध्ये दिसत होती. मराठी भाषेतील गमतीजमती मुलांनी अनुभवल्या.
तमिळनाडू, चेन्नई या भारताच्या दक्षिण भागात तंजावर मराठा साम्राज्याची स्थापना केली. कालांतराने तेथील मराठी भाषिक व्यक्तींवर तमिळ भाषेचा परिणाम झाला. तमिळ व मराठी या दोन्ही भाषामिश्रित तंजावर मराठी नावाची एक नवीच बोलीभाषा निर्माण झाली. १८५५ मध्ये तंजावूर मराठा साम्राज्य संपून गेल्यानंतर तंजावूर मराठी भाषिक नोकरी, व्यवसायाकरिता, शिक्षणाकरिता तमिळनाडू, पुदुचेरी, केरळ, कर्नाटक, आंध्र, तेलंगणात गेले. स्थलांतरासोबत मराठी भाषा व मराठी संस्कारही स्थलांतर झाले. म्हणजेच विसाव्या शतकात या तंजावूर मराठी भाषेवर तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड भाषेचा व्याकरणदृष्ट्या परिणाम झाला. परंतु साडेतीनशे वर्षांनंतरही मराठीपण विसरले नाहीत. आम्ही महाराष्ट्रीयन मराठी असे तेथील मराठी भाषिक अभिमानाने सांगतात.
दक्षिणी तंजावूर मराठी भाषिक लोक व शाळेतील शिक्षक-विद्यार्थी व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात आहेत. शनिवारी शाळेतील मुले त्यांना महाराष्ट्रीयन मराठी शिकवतात.
मराठी भाषेतील म्हणी, समान उच्चाराचे शब्द, यातून होणाºया गमतीजमती जवळून अनुभवतात. या आॅनलाईन चर्चेत शाळेतील विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक राजेंद्र रावळ, देवकी पाटील, राजश्री शिंदे, तारा लोहकरे, नीलम धावडे, तंत्रस्नेही शिक्षक नागनाथ विभूते सहभागी झाले होते. आॅस्ट्रेलियाच्या वेस्टमेडमधील ६६ विद्यार्थीसंख्या असलेल्या आॅस्ट्रेलियन मराठी शाळेशी आॅनलाईन संवाद घडवून आणला होता.
मानसी केळकर या उपक्रमात मदत करत आहेत. इंग्रजी शाळांकडे आकर्षित होणाºया सध्याच्या युगात मराठी भाषा व मराठीपण जपण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:ची इमारत नसलेल्या जिल्हा परिषद शाळांत सुरू असलेला हा उपक्रम नक्कीच मराठी भाषा व मराठी संस्कृतीचे जतन करण्यासाठीचे पुढचे पाऊल समजायला हरकत नाही.