विद्यार्थ्यांची ‘आयटीआय’ला पसंती, राज्यात ८४ टक्के प्रवेश : रिक्त जागा व विद्यार्थ्यांना आणखी एक संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 04:08 AM2017-09-11T04:08:56+5:302017-09-11T04:09:11+5:30
राज्यात एकीकडे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची महाविद्यालये ओस पडत असताना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) मात्र आतापर्यंत जवळपास ८४ टक्के प्रवेश झाले आहे. सुमारे १ लाख ३६ हजार जागांपैकी सध्या केवळ २१ हजार १६३ जागा रिक्त आहेत.
पुणे : राज्यात एकीकडे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची महाविद्यालये ओस पडत असताना औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) मात्र आतापर्यंत जवळपास ८४ टक्के प्रवेश झाले आहे. सुमारे १ लाख ३६ हजार जागांपैकी सध्या केवळ २१ हजार १६३ जागा रिक्त आहेत. दरम्यान, रिक्त जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आणकी एक संधी देण्यात आली.
राज्यात शासकीय संस्थांमध्ये या वर्षी ९३ हजार ४७६ तर खासगी संस्थांमध्ये ४२ हजार ६७४ एवढी अशी एकूण १ लाख ३६ हजार १५० प्रवेशक्षमता आहे. त्यासाठी तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. दि. ४ सप्टेंबर अखेरपर्यंत शासकीय संस्थांमध्ये ८४ हजार ७८१ तर खासगी संस्थांमध्ये ३० हजार २०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. त्यानुसार सध्या अनुक्रमे ८ हजार ६९५ व १२ हजार ४७३ अशा एकूण २१ हजार १६३ जागा रिक्त आहेत.
राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रवेशाचा विचार केल्यास यंदाही जवळपास ४० टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. त्या तुलनेत आयटीआयचे प्रवेश सुमारे ८४ टक्के झाले आहेत. त्यातच रिक्त जागा भरण्यासाठी विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जाणार आहे.
त्यामुळे यातील आणखी काही जागा भरतील. ‘केवळ कमी मागणी असलेल्या व्यवसायामध्ये प्रवेश कमी झाले आहेत. हे व्यवसाय स्वयंरोजगारासाठी उपलब्ध आहेत. इतर व्यवसायांना चांगला प्रतिसाद आहे,’ असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक अनिल जाधव यांनी सांगितले.
शासकीय संस्थांमध्ये एकूण ८ हजार ६९५ जागा, तर खासगी संस्थांमध्ये १२ हजार ४७३ जागा रिक्त आहेत. अद्याप आॅनलाइन नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांना दि. १२ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करून प्रवेश अर्ज भरावा लागेल. यापूर्वी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही. शासकीय संस्थांमध्ये प्रवेशासाठी दि. १३ सप्टेंबर रोजी विशेष समुपदेशन फेरी घेतली जाणार आहे. सकाळी ८ ते ११ या वेळेत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रत्यक्ष संबंधित संस्थेत हजर राहावे लागेल. हजर विद्यार्थ्यांची गुणवत्तायादी लावून त्यानुसार प्रवेश दिला जाईल. खासगी संस्थांमध्ये दि. १३ सप्टेंबरपर्यंत संबंधित संस्थेत प्रत्यक्ष हजर राहून विद्यार्थ्यांना थेट प्रवेश घेता येईल.