‘आयटीआय’साठी विद्यार्थ्यांच्या उड्या
By admin | Published: June 24, 2017 06:10 AM2017-06-24T06:10:26+5:302017-06-24T06:10:26+5:30
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तुलनेत राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडू लागल्या आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तुलनेत राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडू लागल्या आहेत. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेंतर्गत आॅनलाईन नोंदणी सुरू झाल्यानंतर सहा दिवसांतच तब्बल १ लाख ६३ हजार विद्यार्थ्यांनी आयटीआयसाठी नोंदणी केली आहे. अभियांत्रिकीसाठी केवळ १ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.
मागील काही वर्षांपासून अभियांत्रिकीच्या हजारो जागा रिक्त राहतात. तुलनेने ‘आयटीआय’कडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे. यंदा राज्यात आयटीआय प्रवेशासाठी शासकीय व खासगी संस्थांमधील प्रवेशक्षमता एकूण १ लाख ३३ हजार एवढी आहे. केंद्रीय पद्धतीने आॅनलाईन प्रवेशप्रक्रिया १९ जूनपासून सुरू झाली असून, २ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे. मागील सहा दिवसांत १ लाख ६३ हजार ७९१ विद्यार्थ्यांनी अर्जासाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख ५ हजार १०६ विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्ण भरला असून, २४ हजार ५८८ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केला आहे. तर ८ हजार ८२८ विद्यार्थ्यांनी पसंती क्रम अर्जही भरला असल्याची माहिती संचालनालयाकडून देण्यात आली. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी अद्यापही नऊ दिवसांची मुदत आहे. या तुलनेत अभियांत्रिकीचा विचार केल्यास राज्यात यंदा सुमारे १ लाख ४० हजार जागा उपलब्ध असून त्यासाठी सुमारे १ लाख २० हजार अर्ज आले आहेत. याचा अर्थ यंदाही अभियांत्रिकीच्या हजारो जागा रिक्त राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयटीआयला अर्ज करणारे काही विद्यार्थी अन्य अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. त्यामुळे प्रत्यक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या कमी असते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.