विद्यार्थ्यांनी जाणून घेतला विद्यापीठाचा वैभवशाली इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:42 AM2018-02-23T01:42:55+5:302018-02-23T01:43:10+5:30
अन्न वाहून नेण्यासाठी तीनशे फूट लांबीचा बांधण्यात आलेले भुयार, सात कोटी वर्षांपूर्वीच्या बेसाल्ट खडकाच्या दगडातून बांधलेली इमारत, सोन्याच्या मुलाम्याचे केलेले नक्षीकाम आणि १४९ वर्षांची परंपरा
पुणे : अन्न वाहून नेण्यासाठी तीनशे फूट लांबीचा बांधण्यात आलेले भुयार, सात कोटी वर्षांपूर्वीच्या बेसाल्ट खडकाच्या दगडातून बांधलेली इमारत, सोन्याच्या मुलाम्याचे केलेले नक्षीकाम आणि १४९ वर्षांची परंपरा असा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वैभवशाली इतिहास गुरुवारी विद्यार्थ्यांनी जाणून घेतला. निमित्त होते विद्यापीठातर्फे आयोजित हेरिटेज वॉकचे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आॅक्सर्फ्ड आॅफ द इस्ट म्हटले जाते, मात्र या शैक्षणिक ओळखीबरोबरच विद्यापीठाला मोठा ऐतिहासिक वारसासुद्धा लाभला आहे. विद्यापीठाचा हा इतिहास नागरिकांपर्यंत पोहोचावा, त्याचबरोबर सामान्य नागरिकांना विद्यापीठाशी जोडून घेता यावे यासाठी हेरिटेज वॉक या उपक्रमाची सुरुवात गुरुवारी करण्यात आली.
या उपक्रमांतर्गत विद्यापीठाचे ऐतिहासिक व प्राचीन महत्त्व उलगडून सांगण्यात येणार आहे. तसेच विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत तयार करण्यात आलेल्या संग्रहालयाची सफरही घडविण्यात येणार आहे. सध्या असलेली विद्यापीठाची इमारत ही इंग्रजांच्या गव्हर्नरच्या रहिवासाची इमारत होती. पुण्याचा भाग हा मुंबई प्रांतात त्या काळी येत असे. मुंबईत होणाºया मुसळधार पावसामुळे इंग्रज गव्हर्नर पुण्यात राहण्यास येत असत. त्या काळात भारताचा कारभार इंग्रज या इमारतीतून करत . १८६४मध्ये या इमारतीच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली आणि १८७१ रोजी ही इमारत बांधून पूर्ण करण्यात आली. या इमारतीच्या बांधकामासाठी १ लाख ७५ हजार पौंड (१७ ते १८ लाख) इतका खर्च करण्यात आला. त्या वेळी पुणे इलाख्यातून केवळ ३ लाख रुपये इतका वर्षभरात महसूल गोळा होत असे. त्यामुळे महसुलाच्या ६ पट खर्च या इमारतीच्या बांधकामासाठी करण्यात आल्याने गव्हर्नरला इंग्लंडमध्ये विचारणा करण्यात आली होती. तसेच या इमारतीमध्ये ५०० पौंडाचे झुंबर लावण्यात आले होते, त्यासाठीही गव्हर्नरला धारेवर धरण्यात आले होते. या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे, भटारखान्यातून मुख्य इमारतीमध्ये जेवण नेण्यासाठी तब्बल ३०० फुटांचा भुयारी मार्ग इंग्रजांनी तयार केला होता. तो आजही विद्यापीठाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. गव्हर्नरकडे आलेल्या पाहुण्यांना इथले भारतीय गुलाम दिसू नयेत यासाठी या भुयाराची निर्मिती करण्यात आली होती. या भुयारी मार्गामध्ये गरम पाणी व थंड पाणी वाहून नेण्यासाठी दोन वेगवेगळ्या जलवाहिन्याही आहेत. येथे एक खोली असून त्यामध्ये चांदीची भांडी ठेवण्यात येत असत.
इमारतीचे बांधकाम हे बेसाल्ट या दगडामध्ये करण्यात आले आहे. मुख्य इमारतीमध्ये सध्या असलेल्या ज्ञानेश्वर हॉलला त्या वेळी बॉलरूम म्हटले जात असे. या हॉलमध्ये मलेशियाच्या कारागिरांकडून नक्षीकाम करण्यात आले असून, त्यावर सोन्याचा वर्ख चढविण्यात आल्याचे सांगितले जाते. संपूर्ण इमारतीमध्ये सागाच्या लाकडाचा वापर करण्यात आला आहे. १९४९ मध्ये ही इमारत पुणे विद्यापीठासाठी देण्यात आली. विद्यापीठाकडून पुणेकरांसाठी या हेरिटेज वॉकचे पुढेही आयोजन करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.