विद्यार्थ्यांच्या दप्तराला शनिवारी मिळणार सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 11:20 PM2018-12-16T23:20:09+5:302018-12-16T23:20:33+5:30
शिक्षण विभागाचा निर्णय : विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वांगीण कार्यक्रम, शाळेतील उपस्थितीही वाढणार
पुणे : एकीकडे क्लिष्ट असणारा अभ्यासक्रम, रोजच्या विविध तासिका आणि पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे दिवसेंदिवस वाढत आहे. हे ओझे चिमुकल्या खांद्यावर रोज वाहावे लागत असल्यामुळे लहान वयातच विद्यार्थ्यांना पाठीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. विद्यार्थ्यांचे हे ओझे कमी करण्यासाठी एक वर्षी एक पुस्तक एक उपक्रमासाठी प्रयत्न करण्यात आला. त्यात आणखी एक पाऊल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने उचलले असून आठवड्यातील प्रत्येक शनिवार हा आता दप्तराविना राहणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असून त्यांच्या सर्वांगीण विकासाठी शनिवारी विविध उपक्रम शाळेत राबविण्यात येणार आहेत.
विविध विषय, त्यांच्या रोजच्या होणाऱ्या तासिंकामुळे पाठीवर जड दप्तर घेऊन जाणारे विद्यार्थी रोज दिसायाचे. विद्यार्थ्यांचा विचार करता त्यांच्या तब्येतीच्या तुलनेत दप्तराचे ओझे हे जास्त असायचे, यामुळे विद्यार्थ्यांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत होते. हे ओझे कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र, दप्तराच्या ओझ्यात काही बदल झाला नव्हता. हे ओझे कमी करण्यासाठी पुणे जिल्हा परिषतेर्फे एक पुस्तक एक वही हा क्रांतिकारकनिर्णय मुख्यकार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांनी घेतला होता. हा प्रकल्प सध्या प्रायोगिक तत्वावर सुरू आहे. मात्र, विद्यार्थ्यांना आणखी दिलासा मिळावा यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागार्फे आणखी एक नवा उपक्रम राबविला जात आहे. शनिवारी विद्यार्थ्यांची असलेली कमी पटसंख्या पाहता यात वाढ व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना रोजच्या शिक्षणापासून दिलासा मिळावा, या हेतूने यापुढे प्रत्येक शनिवारी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पाठीवर दप्तर दिसणार नाही. शिक्षण विभागाकडून शनिवार हा ‘दप्तरविना’ या उपक्रमाची सुरूवात केली आहे. प्रत्येक शनिवारी शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. मुलांना बौद्धिक विकासाबरोबरच इतर उपक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी यामुळे मिळणार आहे. या मागे दप्तराचे ओझे कमी करणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हा मुख्य उद्देश आहे. शनिवारी शाळा लवकर असल्याने अनेकांकडून शाळा बुडवली जाते. सर्व विद्यार्थी नियमित येण्यासाठी हा उपक्रम सुरू केल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. शनिवारी विनादप्तर आलेल्या विद्यार्थ्यांचे सूर्यनमस्कार, योगा तसेच इतर खेळांचे प्रकार घेतले जातात. प्रत्येक शाळांना अध्ययन समृद्धीची किट देण्यात आली आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांचा अभ्यास घेतला जातो. भाषा आणि गणित विषयांमध्ये विद्यार्थी मागे राहतात. तर काही शाळांना अध्ययन समृद्धी कीट देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून शनिवारी अध्ययन समृद्धी किटच्या सहाय्याने अभ्यास घेतला जातो. यामध्ये अंकगणित, अंकवाचन आदी उपक्रम घेतले जातात.
विद्यार्थ्यांच्या खांद्यावरील ओझे कमी व्हावे यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ‘एक दिवस दप्तराविना’ या उपक्रमामुळे रोजच्या अभ्यासा व्यतिरिक्त विद्यार्थी नव्या गोष्टी शिकतील. यामुळे त्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत मिळेल. तसेच शाळेतील त्यांच्या उपस्थितीचे प्रमाणही वाढेल.
- सूरज मांढरे,
मुख्य कार्यकारी अधिकारी
विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाठी या उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे अध्यापना सोबतच विद्यार्थ्यांचा इतर सर्वांगीण विकास होईल. सह शालेय उपक्रमांमधून जे शिकवणे अपेक्षित आहे ते साध्य होईल.
- सुनील कुºहाडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि. प.