मराठीतून जेईई परीक्षा देण्याकडे विद्यार्थ्यांची पाठ ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:39 AM2020-12-17T04:39:01+5:302020-12-17T04:39:01+5:30
राहुल शिंदे पुणे : जेईई मेन्स परीक्षा स्थानिक भाषेमध्ये देण्याची संधी उपलब्ध करून दिली असली तरी विद्यार्थी आपल्या मातृभाषेतून ...
राहुल शिंदे
पुणे : जेईई मेन्स परीक्षा स्थानिक भाषेमध्ये देण्याची संधी उपलब्ध करून दिली असली तरी विद्यार्थी आपल्या मातृभाषेतून प्रवेश पूर्व परीक्षांची परीक्षेची तयारी करत नाहीत. नीट परीक्षा सुध्दा मराठी भाषेतून देता येते. परंतु, गेल्या दोन वर्षात मराठी भाषेची निवड करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ४० हजाराहून १३ हजारापर्यंत घट झाली आहे. त्यामुळे मराठीचा पर्याय स्वीकारून जेईई मेन्स परीक्षा देणाऱ्याकडे विद्यार्थी पाठच फिरवतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
जेईई मेन्स प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या वर्षापासून विद्यार्थ्यांना मातृभाषेतून परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थी आता इंग्रजीसह हिंदी, उर्दू, कन्नड, मराठी, मल्याळम, उडिया, पंजाबी , तमिळ, तेलगू या भाषेतून जेईई मेन्स परीक्षा देता येणार आहे. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून परीक्षा देणे सोपे जाते, या विचाराने जेईई मेन्स परीक्षेसाठी विविध भाषांचे पर्याय खुले करून दिले आहेत.
केवळ जेईईसाठीच मातृभाषेचा पर्याय उपलब्ध झाला नाही. तर या पूर्वीच वैैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेसाठी मातृभाषेचा पर्याय दिला आहे. तमिळनाडूमध्ये मातृभाषेतून नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, महाराष्ट्रातील विद्यार्थी परीक्षेसाठी मराठीऐवजी इंग्रजीचाच पर्याय अधिक स्वीकारल्याचे दिसून आले आहे.
प्रवेश पूर्व परीक्षांचे अभ्यासक हरीश बुटले म्हणाले, मागील वर्षी महाराष्ट्रातील ४० हजार विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली. तर या वर्षी मराठीचा पर्याय स्वीकारून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ १३ हजार होती. नीट, जेईई या परीक्षांचा अभ्यास मातृभाषेतून करण्यासाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध नाहीत.परिणामी विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे शक्य होत नाही. त्यामुळे जेईई परीक्षा मराठी भाषेतून देण्याबाबत विद्यार्थी फारसे उत्सूक असणार नाहीत.