विद्यार्थ्यांनी केली संघाच्या शिबिराची प्रतिकृती
By admin | Published: November 12, 2015 02:21 AM2015-11-12T02:21:21+5:302015-11-12T02:21:21+5:30
इतिहासप्रेमी मंडळातर्फे यंदा रमणबाग शाळेच्या मैदानावर आगळीवेगळी कलाकृती उभी करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात होणाऱ्या पश्चिम
पुणे : इतिहासप्रेमी मंडळातर्फे यंदा रमणबाग शाळेच्या मैदानावर आगळीवेगळी कलाकृती उभी करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुण्यात होणाऱ्या पश्चिम प्रांताच्या शिबिरस्थानाची रचना या ठिकाणी उभारण्यात आली आहे.
३ जानेवारी २०१६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात महाराष्ट्राच्या ७ जिल्ह्यांतील संघाचे स्वयंसेवक उपस्थित राहणार असून, या कार्यक्रमाची भव्यदिव्यता दाखविण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी ही प्रतिकृती तयार केली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांनी सांगितले.
यामध्ये किल्ल्याला ज्याप्रमाणे तटबंदी असते तशा प्रकारचे प्रवेशद्वार विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक बनविले आहे. तसेच, या शिबिरामध्ये २०० फुटांचे व्यासपीठ असणार आहे त्याच पद्धतीने ३० फुटंचे व्यासपीठ उभारण्यात आले आहे. तसेच संघाच्या गणवेशातील ८०० स्वयंसेवकांच्या मूर्ती तयार करून त्या स्वयंसेवकांमध्ये ज्याप्रमाणे शिस्त असते त्याच पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष या शिबिरामध्ये १ लाख स्वयंसेवक सहभागी होतील, असे उद्दिष्ट आहे. हे शिबिर ऐतिहासिक होणार असून, त्याची भव्यता लक्षात येण्यासाठी या वर्षी हा प्रकल्प उभारला आहे.
बारा वर्षांपासून इतिहासप्रेमी मंडळातर्फे रमणबाग शाळेच्या मैदानावर दिवाळीदरम्यान विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांच्या कलाकृती करीत आहेत. या उपक्रमाला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असून, त्यामुळे मुलांना प्रोत्साहन मिळत असल्याचे शेटे यांनी सांगितले. या प्रकल्पाची सर्व माहिती शालेय विद्यार्थी देत असून, ते येत्या १५ तारखेपर्यंत सकाळी ९ ते दुपारी १२ आणि ४ ते रात्री ९ या वेळात नागरिकांसाठी खुले असेल.