अाराेग्य अाणि करिअरसाठी धावणार एमपीएससीचे विद्यार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 06:06 PM2018-11-25T18:06:42+5:302018-11-25T18:07:22+5:30
विद्यार्थ्यांनी स्वत:च्या आरोग्यासाठी आणि करिअरसाठी धावण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या 9 डिसेंबर रोजी ‘करिअर थॉन’च्या निमित्ताने हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरणार आहेत.
पुणे : राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)वतीने विविध विभागातील रिक्त असलेल्या सुमारे 3 लाख जागांची भरती तात्काळ करावी,यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी निदर्षने केली,हजारोंच्या संख्येने मोर्चे काढले, सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलने केली. मात्र,तरीही शासनाला जाग येत नसल्याने विद्यार्थ्यांनी स्वत:च्या आरोग्यासाठी आणि करिअरसाठी धावण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या 9 डिसेंबर रोजी ‘करिअर थॉन’च्या निमित्ताने हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरणार आहेत.
दिवसेंदिवस राज्यातील शासकीय कार्यालयांमधील रिक्त जागांची संख्या वाढत चालली असून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे.त्यातून जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. अर्थिक परिस्थिती आणि निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. विद्यार्थी तासंतास अभ्यास करतात. मात्र, शासनाकडून रिक्त जागा भरल्या जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे आणि नैराश्याचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या 6 ते 7 विद्यार्थ्यांचा आतड्याचा आजार झाल्याने आणि ह्रृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावरच लक्ष देवू नये तर स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे,या उद्देशाने ‘शिवनेरी फाऊंडेशन’ व ‘एमपीएससी स्टूडेस् राईट्स’च्या वतीने सकाळी 6.30 वाजता टिळक चौक ते शनिवारवाडा दरम्यान ‘करिअर थॉन’रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवनेरी फाऊंडेशनचे संदीप मोहिते म्हणाले,स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे बहुतांश विद्यार्थी दुष्काळी भागातील असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे.अभ्यासाच्या ताणामुळे आणि निकृष्ण अन्न पदार्थामुळे विद्यार्थ्यांना आयोग्याचा समस्या निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात धावताना अभ्यासाबरोबरच अरोग्याचीही काळजी घ्यावी,या उद्देशाने करिअर थॉनचे आयोजन केले आहे. महेश बढे म्हणाले,शासकीय कार्यालयातील रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांनाच त्रास होत नाही.तर कार्यालयात मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे वेळेत काम होत नाही.परिणामी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.तसेच कर्मचारी व अधिका-यांवरही कामाचा ताण वाढतो.त्यामुळे पुणेकर नागरिकांनी व शसकीय कर्मचा-यांनी सुध्दा ‘करिअर थॉन’मध्ये सहभागी व्हावी,असे आवाहन स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे.