विद्यार्थ्यांना करावी लागते एसटीची तासन्तास प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 12:10 AM2019-01-07T00:10:44+5:302019-01-07T00:10:56+5:30
विद्यार्थी ताटकळतात : निमसाखर बसस्थानक वेळापत्रकाचे तीनतेरा
निरवांगी : विद्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी वेळेत एसटी बस नसल्याने निमसाखर (ता. इंदापूर) येथील विद्यार्थ्यांना तासन्तास एसटीची प्रतीक्षा करावी लागत असून कधीच बस वेळेत येत नसल्याने विद्यार्थी दररोज ताटकळत आहेत. बसस्थानक आणि बसच्या फेऱ्यांचे वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले असताना त्याचा थेट फटका प्रवाशांना आणि विशेषत: विद्यार्थ्यांना बसतो आहे.
निमसाखर या ठिकाणी माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आहे. तर या विद्यालयात परिसरातील गावातील व वस्तीवरील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. या बाबत विद्यालयाने अनेक वेळा इंदापूर आगारास शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेत एसटी बस विद्यार्थ्यांना मिळावी असे विनंती पत्र हि दिले. परंतु या पत्राचा दखल आगाराने आनेक घेतली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना बसस्थानकावर तास न तास एसटी बस वाट पाहत बसावे लागते. वालचंदनगर या ठिकाणांहून एसटी बस आली. तरी या बसमध्ये आधीपासूनच भरपूर प्रवासी असल्याने विद्यार्थी बस मध्ये चढूशकत नाहीत. त्यामुळे शाळेच्या वेळात अधिक बसगाड्या सोडाव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.
पालकांनाही पडतोय हेलपाटा
दररोज उशिरा येणारी बस काहीवेळा तर दांड्याच मारते. गाडी रद्द झाल्याची माहिती प्रवाशांना दिली जात नाही त्यामुळे दोन-तीन तास विद्यार्थी ताटकळल्यानंतर आसपासच्या गावात राहणाºया पालकांनाच निमसाखर स्टॅण्डवर हेलपाटा मारावा लागतो. त्यामुळे पालकांसह विद्यार्थी बससेवेवर प्रचंड वैतागले आहेत.
ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना घरी पोचण्यासाठी दुपारचे दोन ते तीन वाजतात. दुपारची शिफ्ट असणाºया विद्यार्थ्यांना तर अनेक वेळा सहा ते साडेसहा वाजता बस मिळते. त्यामुळे अर्धा तासाच्या प्रवासासाठी तब्बल दोन-तीन तास विद्यार्थ्यांना घालावे लागतात. त्यामुळे विद्यार्थी वैतागले आहे.
आगार प्रमुखांनी निमसाखर, वालचंदनगर, कळंब, निरवांगी येथील शाळेच्या व महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांनी एकत्र बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्याची मागणी पालकांमधून होत आहे.