विद्यार्थ्यांची शैक्षणिक, मानसिक तयारी गरजेची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:11 AM2021-05-16T04:11:02+5:302021-05-16T04:11:02+5:30

पुणे : कोरोनामुळे सुमारे दोन वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षाच झाल्या नाहीत. तसेच ऑनलाइन शिक्षणामुळे किती टक्के विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवणे शक्य ...

Students need academic, mental preparation | विद्यार्थ्यांची शैक्षणिक, मानसिक तयारी गरजेची

विद्यार्थ्यांची शैक्षणिक, मानसिक तयारी गरजेची

googlenewsNext

पुणे : कोरोनामुळे सुमारे दोन वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षाच झाल्या नाहीत. तसेच ऑनलाइन शिक्षणामुळे किती टक्के विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकवणे शक्य झाले हे सांगता येत नाही. एकूणच कोरोना काळात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असून ते भरून काढण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाने विद्या‌र्थ्यांची मानसिक व शैक्षणिक तयारी करून घेण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

कोरोनामुळे मार्च २०१९ पासून अनेक विद्यार्थी शाळेतच गेले नाहीत. कोरोना काळात जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे पालकांच्या रोजगारावर परिणाम झाला. शाळेचे शुल्क भरता न आल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवले गेले. इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी तर शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. त्यातच २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला धडपड करावी लागली. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वीच शिक्षण विभागाने ऑनलाइन शिक्षण देण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करावी, अशी अपेक्षा मुख्याध्यापक संघाकडून व्यक्त केले जात आहे.

राज्यातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याचा अहवाल शिक्षण विभागाने नुकताच प्रसिद्ध केला. तसेच सह्याद्री वाहिनी वरून शैक्षणिक कार्यक्रम दाखविण्यास शिक्षण विभागाला अनेक अडचणी आल्या. सध्या शाळा सुरू होणार नाहीत, असे स्पष्ट दिसून येत आहे. पुढील सहा महिने तरी ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सर्व शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण तसेच ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असेही शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांकडून सांगितले जात आहे.

------------------

तब्बल दोन वर्ष विद्यार्थी शाळेत येऊ शकले नाही, त्यामुळे त्यांचे अंतर्गत मूल्यमापन करता येत नाही. दोन वर्ष परीक्षाच झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यात एक प्रकारची शैक्षणिक दरी निर्माण झाली आहे. त्यासाठी काही धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांची मानसिक व शैक्षणिक तयारी करून घ्यावी लागेल.

- एन. के. जरग, माजी माध्यमिक शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य.

---------------

कोरोनामुळे पुढील शैक्षणिक वर्षात सुद्धा ऑनलाइन पद्धतीनेच शिक्षण सुरू ठेवावे लागणार आहे. त्यादृष्टीने शिक्षण विभागाने आत्तापासूनच तयारी सुरू करायला हवी. आवश्यक तांत्रिक साहित्याबरोबरच शिक्षकांना प्रशिक्षण देण्याबाबत आतापासूनच निर्णय घ्यायला हवेत. तसेच सर्व गोष्टींचा विचार करून कोरोना रुग्ण नसलेल्या भागात प्रत्यक्षात शाळा सुरू करता येईल का ? याची चाचपणी करावी.

- हरिश्चंद्र गायकवाड, अध्यक्ष, मुख्याध्यापक संघ, पुणे

--------------

मागील वर्षाप्रमाणे यंदाही ऑनलाईन शिक्षणासाठी चाचपडावे लागू नये. त्यासाठी शिक्षण विभागाने आवश्यक तयारी करून सर्व शाळांना लवकर योग्य निर्देश द्यावेत.

- नारायण शिंदे, अध्यक्ष ,प्राथमिक शिक्षक संघटना, पुणे जिल्हा

Web Title: Students need academic, mental preparation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.