स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी करतायेत कॅन्सरग्रस्त स्वच्छता कर्मचाऱ्यासाठी निधीची उभारणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 04:11 PM2019-11-07T16:11:57+5:302019-11-07T16:21:53+5:30
सफाई कर्मचाऱ्याच्या कॅन्सरवरील उपचारासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी करतायेत निधीची उभारणी
- राहुल गायकवाड
पुणे : आपल्या अभ्यासिकेच्या परिसराची स्वच्छता करणाऱ्या मामांना कॅन्सर आहे हे कळाल्यानंतर तरुणांचे मन हळहळले. मामांची आर्थिक परिस्थिती हालाखीचीच. अशातच आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे असे अनेकांना वाटत हाेते. म्हणून मग त्यांनी त्यांच्या उपचारासाठी निधी गाेळा करण्याचा निर्णय घेतला. ते ज्या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षांची तयारी करतात त्या ठिकाणी त्यांनी एक डाेनेशन बाॅक्स ठेवला अन प्रत्येकाला मदत करण्याचे आवाहन केले. सुरुवातीला विद्यार्थ्यांनी स्वतः पैसै त्या बाॅक्समध्ये टाकले. काहीकरुन मामांच्या उपचाराचा निधी उभा करायचा असा चंग आता या विद्यार्थ्यांनी मनाशी बांधला आहे.
राष्ट्रसेवा दल येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका आहे. या ठिकाणी अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. राष्ट्र सेवा दलाचा परीसर माेठा आहे. या परिसराची साफसफाई पांडुरंग गालफाडे हे मामा करतात. त्यांच्या घरची परिस्थिती तशी हलाखीचीच. त्यांना कॅन्सर झाल्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. परंतु त्यांचा कॅन्सर अद्याप बरा झालेला नाही. त्यांच्यावर उपचार करण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या या कहाणीबद्दल कळाल्यानंतर या अभ्यासिकेत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी एक डाेनेशन बाॅक्स तयार केला. सर्व विद्यार्थ्यांना मामांच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी जमेल तेवढे पैसै त्या डाेनेशन बाॅक्समध्ये टाकले. या विद्यार्थ्यांना गालफाडे यांच्या उपचारासाठी लागणारा निधी उपलब्ध करायचा आहे.
याबाबत बाेलताना येथील विद्यार्थी प्रशांत इंगळे म्हणाला, गालफाडे मामा येथील परिसराची साफसफाई मनापासून करतात. जेव्हा त्यांना कॅन्सरचे निदान झाले तेव्हा त्यांना मदत करायला हवी असे आम्हा सर्वांनाच वाटले. त्यामुळे आम्ही त्यांच्यासाठी निधीची उभारणी करत आहाेत. राेहित पाटील म्हणाला, आजारी असताना देखील गालफाडे मामा परिसराची मनापासून सफाई करतात. त्यांची आर्थिक परिस्थिती देखील बेताची आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी त्यांना आपल्या परीने हाेईल तितकी मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आम्ही डाेनेशन बाॅक्स अभ्यासिकेत ठेवला आहे.
दरम्यान ज्यांना काेणाला मामांच्या उपचारासाठी मदत करायची आहे त्यांनी 7709224548 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले आहे.