विद्यार्थी शाळेत अन् शिक्षक भागवत सप्ताहात, पालकांचा संताप अनावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 12:21 AM2018-12-27T00:21:19+5:302018-12-27T00:21:46+5:30
गोसावीवाडी (ता. इंदापूर) येथील दोन शिक्षकी शाळेत बुधवारी शिक्षकांनीच दांडी मारल्याने मुलांना शिक्षकाविना शाळेचा अनुभव आला.
कळस : गोसावीवाडी (ता. इंदापूर) येथील दोन शिक्षकी शाळेत बुधवारी शिक्षकांनीच दांडी मारल्याने मुलांना शिक्षकाविना शाळेचा अनुभव आला. कहर म्हणजे एक शिक्षक कुठलीही कल्पना न देता गैरहजर होता, तर दुसरा मात्र सकाळी शाळा उघडून गावाकडे भागवत सप्ताहाला गेला. त्यामुळे आज दिवसभर शाळेला कोणी वालीच राहिला नाही आणि मुलांनी दिवसभर वर्गातच दंगा घालण्याचा आनंद घेतला. ही घटना मुलांनी घरी सांगितल्यवर मात्र ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
इंदापुर तालुक्यातील कळस केंद्रातील गोसावीवाडी शाळेत २१ मुले शिक्षण घेत आहेत. याठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहेत मात्र सोमवार पासुन एक शिक्षक शाळेकडे फिरकलाच नाही एक शिक्षक सकाळी येवुन येथील वर्ग खोल्यांचे कुलप उघडून थोडावेळ गावातील भागवत सप्ताहाला निघुन गेले. दुपारी तीन वाजेपर्यंत शिक्षकांविना विध्यार्थी शाळेत बसुन होते. ग्रामस्थांना याची माहिती मिळताच त्यांनी शाळेकडे धाव घेतली. संबंधित शिक्षकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे त्यानंतर शिक्षकांनी सायंकाळी ग्रामस्थांची माफी मागितली.
लोकसहभागातून शाळेचे रूप पालटले आहे. तसेच विविध सुविधा पुरविल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागत असतानाच शिक्षकच असे कुठलीही कल्पन न देता गैरहजर राहिल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्यापासून काय आदर्श घ्यायचा, असा सवालही यावेळी पालकांनी उपस्थित केला.
शाळेमध्ये आज दुपारी तीन वाजेपर्यंत एकही शिक्षक दिसले नाहीत, मुलांना विचारले असता त्यांनी गुरुजी येऊन गेल्याचे सांगितले आम्ही पाच ते सहा ग्रामस्थांनी शाळेत येऊन पाहणी केली असता हा प्रकार
उघडकीस आला
-अंबादास गावडे, ग्रामस्थ
आज घडलेला प्रकार खरा आहे. त्यांनी झालेल्या चुकीबद्दल ग्रामस्थांसमोर माफी मागितली आहे. मात्र, शिक्षकांच्या अशा कृत्यामुळे शाळेची गुणवत्ता ढासळली आहे.
- कैलास गावडे, शाळा समिती अध्यक्ष