लोकमान्य आणि अण्णा भाऊंच्या साहित्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी : अरुणा ढेरे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2019 07:11 PM2019-07-31T19:11:29+5:302019-07-31T19:19:36+5:30
माणसातील स्वत्व जागृत करण्याचे काम लोकमान्यांनी केले तर वंचितांच्या प्रश्नांकडे अण्णा भाऊंनी लक्ष वेधले.
पुणे : लोकमान्य टिळक आणि अण्णा भाऊ साठे या महाराष्ट्र घडवणाऱ्या महत्वाच्या व्यक्ती आहेत. दोघांच्या साहित्यातून स्फूर्ती मिळते. विद्यार्थ्यांनी त्यांच्या साहित्यातून प्रेरणा घेऊन देश घडवावा, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.
लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी आणि अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वषार्रंभानिमित्ताने आज संवाद पुणे आणि श्री विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळातर्फे ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. महापौर मुक्ता टिळक, अण्णा भाऊंच्या सून सावित्रीबाई साठे लोकमान्य टिळक यांचे पणतु दीपक टिळक, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, स्थायी समितीचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष सुनील कांबळे, महोत्सवाचे निमंत्रक राजेश पांडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे, संवाद पुणेचे सुनील महाजन, चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे यांच्या उपस्थितीत पालखीचे, ग्रंथांचे पूजन करण्यात आले.
सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. अण्णा भाऊ साठे यांच्या ग्रंथसंपदेसह लोकमान्य टिळक यांचा गीतारहस्य हा ग्रंथही पालखीत ठेवला होता.
ढेरे म्हणाल्या, आजची दिंडी ही ऐतिहासिक घटना आहे. अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या साहित्यातून समरसता हेच सूत्र दिसून येत आहे. भारत पारतंत्र्यात साहित्य लिहिणे अवघड होते. हे वाचूनच आपल्यासमोर कामाच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. आता सगळ्यांनी एकत्र येऊन देश घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
दीपक टिळक म्हणाले, अण्णा भाऊ साठे आणि लोकमान्य टिळक या महापुरुषांनी मानवाच्या स्वातंत्र्याचा विचार केला. माणसातील स्वत्व जागृत करण्याचे काम लोकमान्यांनी केले तर वंचितांच्या प्रश्नांकडे अण्णा भाऊंनी लक्ष वेधले. साठे यांच्या लिखाणामुळे प्रस्थापित साहित्याचा केंद्रबिंदू बदलला. साहित्यातून परिवर्तन घडू शकते हे या दोघा महापुरुषांच्या साहित्यातून दिसून येते.
दोघांनी आपल्या सहित्यातून निद्रित समाजाला जागे केले. लोकमान्य आणि अण्णा भाऊंच्या साहित्याचे वाचन विद्यार्थ्यांनी करायला हवे, असे आवाहन मुक्ता टिळक यांनी केले.
ग्रंथदिंडीत महाविद्यालयीन विद्यार्थी, साहित्यिक,कलावंत, आळंदीतील बालकीर्तनकार यांचा समावेश होता. बालकिर्तनकारांनी टाळ-मृदंगाचा गजर केला. तर बँड पथकाने देशभक्तीपर गीते सादर केली.
सारसबाग येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. ग्रंथदिंडी बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक,नारायण पेठमार्गे येऊन केसरीवाड्यात दिंडीचा समारोप झाला. केसरीवाड्यात टिळक कुटुंबियांतर्फे रोहित टिळक यांनी ग्रंथदिंडीचे स्वागत केले.
...............
१ ऑगस्टला राज्य शासनाने सुटी जाहीर करावी
पुण्यात पहिल्यांदाच आले आहे. अण्णा भाऊंची स्नूषा म्हणून मिळालेला सन्मान माज्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. लोकमान्य टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वषार्रंभानिमित्ताने टिळक आणि साठे कुटुंबिय पहिल्यांदाच एकत्र आल्याने मन भरुन आले आहे. महारुषांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त राज्य शासनातर्फे सुट्टी दिली जाते. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त १ आॅगस्टला राज्य शासनाने सुटी जाहीर करावी, अशी मागणी साठे यांच्या स्नूषा सावित्रीबाई साठे यांनी केली आहे.