विद्यार्थ्यांनी गुणांनुसार पर्याय निवडावेत - डॉ. जगदीश चिंचोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:01 AM2018-06-13T01:01:19+5:302018-06-13T01:01:19+5:30
आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्याला मिळालेले गुण लक्षात घ्यावेत व त्यानुसार पर्याय निवडावेत, असा सल्ला मॉडर्न महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य डॉ. जगदीश चिंचोरे यांनी दिला. अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसंबंधी त्यांच्याशी साधलेला संवाद...
दहावीची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना वेध लागतात ते अकरावीच्या प्रवेशाचे. आता तर आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेमुळे सगळ्याच गोष्टी सहजसोप्या झाल्या असल्या, तरी पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासंंबंधीची चिंता सतावत असते. आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेचा फॉर्म भरताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्याला मिळालेले गुण लक्षात घ्यावेत व त्यानुसार पर्याय निवडावेत, असा सल्ला मॉडर्न महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य डॉ. जगदीश चिंचोरे यांनी दिला. अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसंबंधी त्यांच्याशी साधलेला संवाद...
दहावीचा निकाल, निकालानंतर अकरावीच्या प्रवेशाची चिंता यामुळे पालक आणि पाल्य यांना अनेक प्रश्न पडलेले दिसून येतात. साधारणपणे अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेसाठी आॅनलाईन अर्ज करताना सर्वप्रथम आपल्याला मिळालेले गुण लक्षात घ्यावेत. त्यानुसार आपल्यासमोर उपलब्ध पर्यायांची निवड करावी. गुणांना केंद्रबिंदू मानावे. याचे मुख्य कारण असे, की सगळ्याच विद्यार्थ्यांना शहरातील प्रसिद्ध महाविद्यालयांमध्ये प्रवेश हवा असतो. मात्र, प्रत्यक्षात ते गुणवत्ता यादीनुसार शक्य नसते. अशा वेळी विद्यार्थ्यांनी टाकलेल्या पर्यायांमधून त्यांच्या गुणांनुसार महाविद्यालय उपलब्ध होते. दुसरा मुद्दा म्हणजे, ज्या महाविद्यालयाला पसंतीक्रम देत आहोत, त्याचा मागील वर्षीचा कट आॅफ तपासावा. जेणेकरून, विद्यार्थ्यांना चालू काळातील गुणवत्ता यादीचे भान येईल. जातिनिहाय मिळणाऱ्या प्रवेशप्रक्रियेमध्ये याचा संदर्भ घेणे महत्त्वाचे ठरते. गुणांनुसार प्रवेशाची माहिती घेतल्यास वेळेची व पैशांची बचत तर होतेच; शिवाय पालक आणि विद्यार्थ्यांना होणारा मनस्तापदेखील कमी होण्यास मदत होते. यामुळे आॅनलाईन फॉर्म बारकाईने आणि काळजीपूर्वक भरावा. त्याबद्दल काही शंका असल्यास संंबंधित महाविद्यालयाशी दूरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा. यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची झाल्यास घरापासून महाविद्यालयाचे अंतर. हे अंतर सोयीचे आहे किंवा नाही, याचा विचार करणे महत्त्वाचे आहे. बºयाचदा विद्यार्थी घाईने अथवा चुकीने पर्यायाची निवड करतात. मात्र, उशिरा त्यांना लक्षात येते, की आपण निवडलेला पर्याय महागात पडणार आहे. अशा वेळी पुन्हा मग दुसºया फेरीदरम्यान त्यांना बदल करावे लागतात.
या चुका होऊ नयेत, यासाठीच सुरुवातीच्या काळात महाविद्यालयाचे घरापासूनचे अंतर, पोहोचण्यास लागणारा वेळ या गोष्टी प्राधान्यक्रमाने लक्षात घ्याव्यात. ज्या महाविद्यालयाची निवड विद्यार्थी करीत आहे, त्या महाविद्यालयात कुठले विषय शिकविले जातात, याची माहिती घ्यावी. अनेकदा अमुक एखाद्या विद्यार्थ्याला जर्मन, गणित, जीवशास्त्र विषयांना पर्याय निवडायचे असतात. मात्र, त्या महाविद्यालयात हे विषय शिकविले जात नसतील, तर विद्यार्थ्यांना निराशेला सामोरे जावे लागते. याविषयी संबंधित महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर सर्व माहिती नमूद केली जाते ती विद्यार्थी व पालक यांनी वाचणे महत्त्वाचे आहे. तसेच, आपण कुठल्या गटातून प्रवेश घेत आहोत? उदा.- खेळाडू, अपंग किंवा स्वातंत्र्यसैनिकांचा नातू यांपैकी कुठल्याही एका प्रकारातून विद्यार्थी अर्ज करणार असतील, तर आवश्यक त्या कागदपत्रांची माहिती विद्यार्थ्यांनी घेणे जरुरीचे आहे.
कागदपत्रांची माहिती वेळीच न घेतल्यास त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेवर झालेला दिसून येतो. याशिवाय, आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेत अनुदानित, विनाअनुदानित असे दोन पर्याय नमूद केलेले असून त्याची अभ्यासपूर्ण माहिती विद्यार्थी व पालकांनी घ्यायला हवी. अनेकदा विद्यार्थ्यांकडून विनाअनुदानित गटातून प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज केला जातो. प्रत्यक्षात ज्या वेळी प्रवेश शुल्क भरण्याची वेळ येते, तेव्हा मात्र पालक नाराजी व्यक्त करू लागतात. एकूणच आॅनलाईनच्या प्रवेशप्रक्रियेत नकारात्मक असे काही नसून ते पालकांच्या सोयीकरिता आहे. आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेनुसार प्रत्येक विद्यार्थ्याला खात्रीने प्रवेश तर मिळतोच; मात्र तो प्रवेश जास्त डोकेदुखीचा विषय न होता सहजसोपा व्हावा, याकरिता विद्यार्थी व पालक या दोघांनी काळजी घ्यायला हवी.