विद्यार्थ्यांची लढाई सुरूच ठेवायला हवी : कन्हय्याकुमार
By admin | Published: March 29, 2016 03:43 AM2016-03-29T03:43:56+5:302016-03-29T03:43:56+5:30
सध्या चालू असलेली लढाई ही विद्यार्थ्यांची लढाई असून ती सातत्याने सुरू ठेवायला हवी. या लढाईतील मी एक लढवय्या असून, समता आणि न्यायासाठी येत्या काळात महाराष्ट्रात येणार आहे, असे
पुणे : सध्या चालू असलेली लढाई ही विद्यार्थ्यांची लढाई असून ती सातत्याने सुरू ठेवायला हवी. या लढाईतील मी एक लढवय्या असून, समता आणि न्यायासाठी येत्या काळात महाराष्ट्रात येणार आहे, असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्याकुमार याने पुण्यातील पत्रकारांना सांगितले.
आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी कन्हय्याकुमारने पुण्यातील पत्रकारांशी दूरध्वनीवरून संवाद साधला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) विद्यार्थी नेता कन्हय्याकुमारच्या सभा महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले. एप्रिल महिन्यात पुणे, मुंबई, कोल्हापूर, बीड, अमरावती आणि औरंगाबाद या ठिकाणी सभा घेण्यात येणार आहे. सभांचे नियोजन सुरू असून लवकरच तारखेची अधिकृत घोषणा करण्यात येईल, अशी माहिती आॅल इंडिया स्टुडंट फेडरेशन (एआयएसएफ) व आॅल इंडिया यूथ फेडरेशनने (एआययूएफ) सोमवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी एआयएसएफचे राज्याध्यक्ष पंकज चव्हाण, एआययूएफचे राज्य अध्यक्ष प्रसाद घागरे, गिरीश फोंडे, अभय टांकसाळ, सुशील लाड उपस्थित होते. सर्व पुरोगामी शक्तींना एकत्र घेऊन मोठ्या प्रमाणात सभा आयोजित केली जाणार आहे. कोल्हापूर येथे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या विचारधारेला मानणारा मोठा वर्ग असल्याने कन्हय्याला विरोध झालेला नाही. सभा घेण्यासाठी कोल्हापूरमधून सर्वाधिक पाठिंबा मिळत असल्याचे घागरे याने सांगितले.
प्रसाद घागरे म्हणाले, ‘‘जेएनयूमध्ये ९ फेब्रुवारी रोजी देशविरोधी घोषणा दिल्याबद्दल विद्यार्थी नेता कन्हय्याला अटक करण्यात आली. मात्र, दिल्ली पोलिसांना उच्च न्यायालयात कन्हय्याविरोधात एकही पुरावा सापडला नाही. बनाव करून कन्हय्याला तुरुंगात डांबण्यात आले. विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रकार सत्ताधारी भाजप व त्यांच्या विद्यार्थी संघटना करीत आहेत. फर्ग्युसन महाविद्यालय व रानडे इन्स्टिट्यूटमध्येही असाच प्रकार घडला. या प्रकरणाची दिल्ली एआयएसएफने दखल घेऊन पुण्यातील विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शविला आहे. कन्हय्याकुमारने पुण्यात येऊन सभा घेण्याबाबत रानडे इन्स्टिट्यूट व फर्ग्युसन महाविद्यालयातील पत्र एआयएसएफ राज्य कौन्सिलला मिळाले आहे. पुण्यासह औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, नागपूर व अमरावती या ठिकाणी सभा घेण्याबाबत प्रस्ताव आला आहे.
धमक्या देणं हे संघ आणि भाजपाला नवं नाही. ये इनकी आदत है..! असे सांगत त्याने अभाविपच्या धमकीची खिल्ली उडवली. आपल्याकडे लढल्याशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही; त्यामुळे वेळोवेळी लढावे लागते. भाजपा काय आणि त्यांचा युवा मोर्चा काय; एकाच माळेचे मणी आहेत. आपण त्यांच्याकडे लक्ष न देता आपला प्रवास सुरूच ठेवायला हवा. आम्ही पुण्यातील विद्यार्थ्यांसोबत आहोत. भारतात सध्या सत्तेचा गैरवापर करून लोकांना त्रास देणे सुरू आहे. मात्र, ही लढाई स्वातंत्र्यासाठी आणि लोकशाहीसाठी आहे! जेएनयूपाठोपाठ फर्ग्युसन महाविद्यालयात विद्यार्थ्यांना देशविरोधी ठरविण्याचा प्रकार हा लोकशाहीला घातक आहे. देशाचे संविधान बदलण्याचा घाट भाजपा व आरएसएससारख्या शक्ती घालत आहेत. सध्याचे सरकार हे अल्पसंख्याक, शेतकरी आणि गोरगरिबांच्या विरोधात आहे. या सरकारमुळे देशाच्या स्वातंत्र्यालाच धोका असल्याची टीका कन्हय्याने या वेळी केली. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याविरोधात देशभरात कुठेही आंदोलने झाली, तर त्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम मी करणार आहे, असेही तो म्हणाला.