विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे - शिरीष पटवर्धन
By admin | Published: March 4, 2017 03:50 PM2017-03-04T15:50:18+5:302017-03-04T15:50:18+5:30
"विद्यार्थ्यांनी पैशाच्या मागे न लागता आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे," असे प्रतिपादन मत स्वरूप वर्धिनी संस्थेचे उपाध्यक्ष शिरीष पटवर्धन यांनी केले.
Next
ऑनलाइन लोकमत
चाकण, दि. 4 - "विद्यार्थ्यांनी पैशाच्या मागे न लागता आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे," असे प्रतिपादन मत स्वरूप वर्धिनी संस्थेचे उपाध्यक्ष शिरीष पटवर्धन यांनी केले. चाकण शिक्षण मंडळाच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात पारितोषिक प्रदान समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ते म्हणाले, "औपचारिक शिक्षण हे जगण्यासाठी तोकडे आहे. औपचारिक शिक्षण ज्या क्षेत्रात घेतले, त्या क्षेत्रातच विद्यार्थ्यांनी करिअर केले पाहिजे असे नाही. ज्यात आनंद व समाधान मिळेल, अशा क्षेत्रात जाण्यासाठी विद्यार्थ्यांनी धडपड करावी. ज्ञानशाखा ही सतत वृद्धिंगत होत असते, शिक्षण हे कधीही संपत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सातत्याने ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न करावा. केवळ पैसा मिळविणे म्हणजे यशस्वी होणे नव्हे. व्यक्तीने चारित्र्य संपन्न असणे अधिक महत्वाचे आहे. स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी नवनवीन शिखरे पादाक्रांत करून यशस्वी व्हावे," असे विचार त्यांनी व्यक्त केले.
संस्थेचे विश्वस्त सचिव डॉ. अविनाश अरगडे यांनी 'विद्यार्थ्यांनी आपल्या उणिवांवर मात करीत यश संपादन करावे' असे मत व्यक्त केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त मोतीलाल सांकला, सचिव डॉ. अविनाश अरगडे यांनी प्रबंधक कैलास पाचारणे, पीएचडी धारक प्राध्यापक डॉ. सोपान घोळवे, डॉ. अपर्णा महाजन व यशस्वी विद्यार्थी विद्यार्थिनींचे कौतुक केले व पारितोषिक प्रदान करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य राजेश लाटणे यांनी केले. यावेळी हेमकांत गावडे, रघुनाथ आपटे, शैलेंद्र कांबळे, विकास देशमुख, डॉ. दिलीप कसबे, अॅड. राजेश कांडगे, पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.