विद्यार्थ्यांनी देशविकासाचा आणि विश्वकल्याणाचा मंत्र जपावा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 03:52 PM2022-09-19T15:52:52+5:302022-09-19T15:54:46+5:30

भविष्यातही संस्थेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी भरीव निधीद्वारे योगदान देतील, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली...

Students should uphold the mantra of national development and universal welfare - Governor Bhagat Singh Koshyari | विद्यार्थ्यांनी देशविकासाचा आणि विश्वकल्याणाचा मंत्र जपावा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

विद्यार्थ्यांनी देशविकासाचा आणि विश्वकल्याणाचा मंत्र जपावा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Next

पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा अभ्यास करताना देशविकासाचा, मानवतेचा आणि पर्यायाने विश्वकल्याणाचा मंत्र जपावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. 

सीओईपी माजी विद्यार्थी संघटनेतर्फे अभियंता दिनानिमित्त आयोजित 'सीओईपी अभिमान अवॉर्ड्स' वितरण सोहळ्यात राज्यपाल कोश्यारी बोलत होते. कार्यक्रमास राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, सीओईपीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष प्रतापराव पवार, सीओईपी संचालक प्रा. डॉ. मुकुल सुतावने, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भारत गीते, मानद सचिव प्रा. एस.एस. परदेशी आदी उपस्थित होते. 

सीओईपीच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख करताना राज्यपाल म्हणाले, येथून विश्वविख्यात अभियंता भारतरत्न एम. विश्वेश्वरय्या यांच्यासह आपल्या क्षेत्रातील उच्च व्यक्तिमत्वे घडली. त्यांनी आपल्या मातृभूमीसाठी केलेले कार्य विद्यार्थ्यांसमोर ठेवले पाहिजे. आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये पुढे जात असताना त्या माध्यमातून देशासाठी काम करावे. आज आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना संपूर्ण जग भारताकडे आशेने पहात आहे. जगामध्ये आपापसात सहयोगाचे युग आले असून त्याचा लाभ अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असेही श्री. कोश्यारी म्हणाले. 

कोश्यारी पुढे म्हणाले, सध्याचे युग हे कृत्रिम प्रज्ञा (एआय), इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी आणि सायबर क्षेत्राचे असल्याने या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी काम करावे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक तरतुदी आहेत. आंतर विद्याशाखीय अभ्यास रचना केल्यामुळे विद्यार्थ्यांना एका क्षेत्रात शिक्षण सुरू असताना मध्येच त्याच्या आवडीप्रमाणे वेगळ्या क्षेत्रातील शिक्षणाकडे वळता येईल. या तरतुदींचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असेही ते म्हणाले. 

सामाजिक दायित्व जपत संस्थेसाठी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याची भूमिका ठेवल्याबद्दल सीओईपीच्या माजी विद्यार्थी संघटनेचे कौतुक करत भविष्यातही संस्थेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी भरीव निधीद्वारे योगदान देतील, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. 

प्रतापराव पवार म्हणाले, या संस्थेचा मोठा इतिहास असून येथील विद्यार्थी शिक्षण घेत असताना ज्ञानाची निर्मिती करतात. महाविद्यालयाचे विद्यापीठामध्ये रूपांतर झाल्यामुळे ते ज्ञाननिर्मितीचे विद्यापीठ बनणार आहे. आपण देशातील नव्हे तर जगातील उत्तमोत्तम विद्यापीठाशी स्पर्धा करायला हवी. संस्थेला शासनानेही मोठे सहकार्य लाभत असून १५० कोटी रुपयांचा निधी तसेच नवीन कॅम्पस साठी ३० एकर जागा दिली आहे. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत अभ्यासरचनेद्वारे भविष्य घडवावे, असेही त्यांनी आवाहन केले. 

Web Title: Students should uphold the mantra of national development and universal welfare - Governor Bhagat Singh Koshyari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.