महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनाच दाखविले प्राध्यापक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 09:06 PM2018-07-10T21:06:08+5:302018-07-10T21:18:13+5:30
संस्थेमध्ये शिकत असलेले तसेच पास आऊट झालेले विद्यार्थीच तिथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्याचे भन्नाट रेकॉर्ड बनविण्यात आले आहे...
पुणे : नऱ्हे आंबेगाव येथील एका तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये तिथे शिकत असलेल्या ५३ विद्यार्थी तिथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्याचे दाखवून त्यांच्या वेतनावर एका वर्षात ४० लाख रूपयांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. महाविद्यलयाच्या खर्चाचा आकडा फुगवून शुल्क नियामक प्राधिकरणाकडून विद्यार्थ्यांच्या शुल्काची रक्कम वाढविण्यासाठी हा फंडा वाढविण्यात आल्याचे उजेडात आले आहे.
नऱ्हे आंबेगाव येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे माजी कार्यालयीन अधीक्षक व अकाऊंट योगेश ढगे यांनी याप्रकरणी तंत्रशिक्षण संचलनालय, धर्मादाय आयुक्तालय येथे लेखी तक्रार केली आहे. त्या तंत्रनिकेतन महाविद्यालयांमध्ये नियमबाहय अनेक बेकायदेशीर प्रकार घडत असल्याचे त्यांनी या लेखी तक्रारीव्दारे निर्दशनास आणून दिले आहे.
योगेश ढगे यांनी सांगितले, व्यावसायिक महाविद्यालयांना प्राध्यापक, कर्मचारी यांचे पगार व इतर प्रशासकीय खर्च यावर किती रक्कम खर्ची पडते, त्या आधारावर विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारणी करण्यास परवानगी दिली जाते. विद्यार्थ्यांवर मोठी शुल्कवाढ लादण्यासाठी संस्थाचालकांकडून हा खर्च मोठया प्रमाणात फुगविण्यात आला आहे. संस्थेमध्ये शिकत असलेले तसेच पास आऊट झालेले विद्यार्थीच तिथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असल्याचे भन्नाट रेकॉर्ड बनविण्यात आले आहे. पगारापोटी संस्थेकडून २०१५-१६ या वर्षात ७९ लाख ९६ हजार ९४५ रूपये खर्च करण्याचा अहवाल शुल्क नियामक प्राधिकरणाला सादर करण्यात आला. प्रत्यक्षात त्या वर्षात पगारावर ३९ लाख ९१ हजार ८४२ रूपये खर्च करण्यात आला. प्राध्यापक दाखविण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना कॅश मेमोव्दारे पगार दिल्याचे रेकॉर्ड बनविण्यात आले. त्याचबरोबर संस्थेचे प्राध्यापक, कर्मचारी यांच्या बँकेतील खात्यावर पगाराच्या मोठया रकमा जमा केल्याचे दाखविले जाते, त्यानंतर त्यातील काही रक्कम सेल्फ चेक व्दारे पुन्हा काढून घेण्यात आली.’’
कार्यालयीन अधीक्षक म्हणून मला ७० हजार रूपये पगार देण्यात येत असल्याचे कागदोपत्री दाखविले, त्यानुसार माझ्या बँक खात्यात दरमहा ७० हजार रूपये रक्कम जमा केली जात असे, त्यानंतर सेल्फ चेक व्दारे २० हजार रूपये त्यातून काढून घेतले जात. त्यासाठी पगार जमा करण्यापूर्वीच सेल्फच्या चेकवर सहया घेतल्या जातात. संस्थेतील १५० प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत हाच प्रकार घडत आहे. या वाढीव खर्चाच्या आधारावर तंत्रनिकेतच्या विद्यार्थ्यांकडून हजारो रूपये फि महाविद्यालयांकडून घेतली जात आहे, यामुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिंक भुर्दंड सहन करावा लागत आहे अशी तक्रार ढगे यांनी केली आहे.
...............
एका तंत्रनिकेतन महाविद्यालयात ४३७ कर्मचारी
एका तंत्रनिकेत महाविद्यालयामध्ये प्राध्यापक व कर्मचारी मिळून १५० जणांचा स्टाफ आवश्यक असतो. मात्र नºहे आंबेगावच्या महाविद्यालयात ४३७ कर्मचारी कार्यरत असल्याचे रेकॉर्ड बनविण्यात आले. त्यामध्ये काही कर्मचारी आले नंतर सोडून गेले असे दाखविण्यात आले अशी तक्रार योगेश ढगे यांनी केली आहे.ब्लॅक मनी व्हाइट करण्याचा फंडा
महाविद्यालयाकडे मॅनेजमेंट कोटा प्रवेश, डोनेशन यामाध्यमातून जमा झालेला ब्लॅक मनी व्हाइट करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विविध शुल्कापोटी पैसा जमा झाल्याच्या बनावट रिसीट बनविण्यात आल्या. बहुतांश शिक्षण संस्थांमध्ये घडतात. हे प्रकार शुल्क वाढीसाठी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे वाढीव पगार दाखविणे, इतर खोटा खर्च मांडणे असे फंडे अनेक शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक महाविद्यालयांमध्ये राबविले जातात. मात्र अत्यंत गोपनीय पध्दतीने बनावट कागदपत्रे तयार केली जात असल्याने हे प्रकार उजेडात येत नाहीत. नऱ्हे आंबेगावच्या महाविद्यालयातील कार्यालयीन अधीक्षक व अकाऊंट योगेश ढगे यांनी कागदोपत्री पुराव्यानिशी तक्रार केल्याने त्यावर प्रकाश पडला आहे. मात्र, त्याची व्याप्ती केवळ त्या महाविद्यालयांपुरती निश्चितच नाही. त्यामुळे इतर महाविद्यालयांच्या यासंदर्भातील कागदपत्रांची शुल्क नियामक प्राधिकरण, तंत्र शिक्षणालय यांनी काटेकोरपणे तपासणी करावी अशी मागणी ढगे यांनी केली आहे.