‘श्रीनाथ म्हस्कोबा’च्या साखर शाळेत विद्यार्थी गिरवतात शिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 01:48 AM2019-01-29T01:48:27+5:302019-01-29T01:48:59+5:30
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने चालू गळीत हंगामात कारखाना कार्यस्थळावर दाखल झालेल्या ऊसतोड मजुरांच्या शालाबाह्य मुलांसाठी साखर शाळा सुरु करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी दिली.
पाटेठाण : पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या वतीने चालू गळीत हंगामात कारखाना कार्यस्थळावर दाखल झालेल्या ऊसतोड मजुरांच्या शालाबाह्य मुलांसाठी साखर शाळा सुरु करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी दिली. गळीत हंगामात जवळपास पाचशेपेक्षा जास्त कुटुंबे स्थायिक झाली असून, ऊसतोड मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी कारखान्याच्या पक्क्या इमारतीमध्ये गेली नऊ-दहा वर्षांपासून साखर शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटेठाणच्या नियंत्रणाखाली भरत आहे.
गळीत हंगामाच्या सुरुवातीला ऊसतोड मजुरांचे नोव्हेंबरपासून आगमन झाल्यानंतर केन्द्र प्रमुख संपत सटाले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पाटेठाण येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मारुती आडसूळ, सहकारी उपशिक्षक सुभाष शिंदे, राजेन्द्र गावडे, हरिभाऊ थोरात, संतोष कुंभार, आनंद भोसले यांनी कामगारांच्या वस्तीकडे जाऊन मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत मजूर कामगारांच्या भेटी घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रोत्साहित करण्यात आले. पहिली ते सातवीपर्यंत सत्तर पटसंख्या असून, दररोज उपस्थित राहून विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहे. संतोष सोनवणे, मीरा मोरे यांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करीत आहेत.
स्थलांतरित व आर्थिक मागास मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी कारखाना व्यवस्थापन नेहमीच प्रयत्नशील असून, गेल्या तीन वर्षांपासून ऊसतोड व वीटभट्टी मजुरांच्या मुलांसाठी तळेगाव येथे मोफत वसतिगृहदेखील चालवण्यात येत असून याचबरोबर स्वच्छ भारत अभियान, शेतकरी परिसंवाद, आरोग्य शिबिर अशा प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत.
- पांडुरंग राऊत, अध्यक्ष श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना पाटेठाण