फर्ग्युसनमध्ये विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, मराठीतून अभ्यासक्रमाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 03:31 AM2018-06-15T03:31:54+5:302018-06-15T03:31:54+5:30

फर्ग्युसन महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून हद्दपार करण्याच्या हेतूने बीएच्या विद्यार्थ्यांना मराठीतून अभ्यासक्रम करण्याची परवानगी नाकारण्यात येत असल्याचा आरोप करून बीएच्या दुसऱ्या वर्गात शिकणाºया विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ठिय्या आंदोलन केले.

Students' stance agitation in Ferguson, curriculum demand from Marathi | फर्ग्युसनमध्ये विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, मराठीतून अभ्यासक्रमाची मागणी

फर्ग्युसनमध्ये विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, मराठीतून अभ्यासक्रमाची मागणी

Next

पुणे - फर्ग्युसन महाविद्यालयातील गरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून हद्दपार करण्याच्या हेतूने बीएच्या विद्यार्थ्यांना मराठीतून अभ्यासक्रम करण्याची परवानगी नाकारण्यात येत असल्याचा आरोप करून बीएच्या दुसऱ्या वर्गात शिकणाºया विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ठिय्या आंदोलन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या. तसेच, मराठीतून अभ्यासक्रम पूर्ण करण्याची मागणी लावून धरली.
फर्ग्युसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमांमधून पॉलिटिकल सायन्स, अर्थशास्त्र, इतिहास, मराठी, मानसशास्त्र विषायांत अभ्यासक्रम पूर्ण करता येत होता. परंतु, महाविद्यालय प्रशासनाने इतिहास आणि समाजशास्त्र विषयांसाठी मराठीतून अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार नाही, असे अचानक जाहीर केले. त्यामुळे दुसºया वर्षासाठी मराठीतून अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाºया ५० ते ६० विद्यार्थ्यांनी प्राचार्यांच्या खोलीबाहेर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला जनता दल युनायटेडचे सरचिटणीस कुलदीप आंबेकर यांनी पाठिंबा दिला होता. याबाबत कौस्तुभ पाटील हा विद्यार्थी म्हणाला, ‘‘महाविद्यालयाने दुसºया वर्षाची प्रवेशप्रक्रिया सुरू असताना अचानक इतिहास व समाजशास्त्र विषयांच्या अभ्यासक्रमांना मराठीतून प्रवेश घेता येणार नाही, असे जाहीर केले. तसेच, महाविद्यालयाला हे अभ्यासक्रम मराठी माध्यमातून घेण्यासाठी परवानगी नसल्याचे सांगितले. परंतु, इतकी वर्षे हा अभ्यासक्रम मराठीतून होत असताना यंदाच्या वर्षी अचानक का बंद करण्यात येत आहे? प्रशासनाने कुठलेही उत्तर दिले नाही. मराठी माध्यमात शिकणारी मुले हे गावाकडील, गरीब घरातील विद्यार्थी आहेत. त्यांना अचानक इंग्रजीमधून अभ्यासक्रम पूर्ण करता येणे शक्य नाही. मराठीतील अभ्यासक्रम बंद करून सर्व अभ्यासक्रम इंग्रजीमध्ये करायचे आहेत. असे झाल्यास गरीब विद्यार्थ्यांना फर्ग्युसनमधून शिक्षण घेता येणार नाही.’’
विद्यार्थी प्रतिनिधी संध्या सोनवणे म्हणाली, ‘‘या विषयांबाबत प्राचार्य व उपप्राचार्य यांच्याशी गेल्या काही दिवसांपासून संवाद साधण्यात येत होता. प्रशासनाकडून आधीपासूनच या अभ्यासक्रमांना मान्यता नसल्याचे सांगण्यात आले. यंदाच्या वर्षापासून मराठीतून अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार नसल्याचे महाविद्यालयाने जाहीर केल्याने विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले.’’

बीएच्या विद्यार्थ्यांना इतिहास आणि समाजशास्त्र या विषयांत मराठी माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण करण्याला यापूर्वी परवानगी देण्यात येत होती. मात्र, यंदापासून शिक्षण विभागाच्या नियमांनुसार हे अभ्यासक्रम मराठी माध्यमातून करता येणार नसल्याचा निर्णय महाविद्यालय प्रशासनाने घेतला आहे. विद्यार्थ्यांची इच्छा असल्यास त्यांना मराठी माध्यमातून इतिहास आणि समाजशास्त्र विषय घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करण्याची परवानगी मिळण्याबाबत प्रयत्न करू.
- डॉ. आर. जी. परदेशी
प्राचार्य, फर्ग्युसन महाविद्यालय

Web Title: Students' stance agitation in Ferguson, curriculum demand from Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.