लोणी काळभोर येथील एमआयटीच्या विद्यार्थ्यांना गुलाबजाम पावडरमुळे त्रास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 08:29 PM2018-08-29T20:29:17+5:302018-08-29T20:50:49+5:30
विद्यापीठातील मेसमध्ये एक हजारांहून अधिक विद्यार्थी दररोज जेवण करतात. मंगळवारी (दि. २८) दुपारी नेहमीप्रमाणे जेवणानंतर सधारणत: ४५ ते ५० विद्यार्थ्यांना पोट दुखणे आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला.
पुणे : लोणी काळभोर येथील एमआयटी-आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील मेसमध्ये गुलाबजाम पावडरमुळे विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचा अंदाज संस्थेने व्यक्त केला आहे. या पावडरची पाकिटे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली असून या प्रकाराच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी दिली.
विद्यापीठातील मेसमध्ये एक हजारांहून अधिक विद्यार्थी दररोज जेवण करतात. मंगळवारी (दि. २८) दुपारी नेहमीप्रमाणे जेवणानंतर सधारणत: ४५ ते ५० विद्यार्थ्यांना पोट दुखणे आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने संबंधित विद्यार्थांना उपचारासाठी संस्थेच्या विश्वराज हॉस्पीटलमध्ये दाखल केले. यातील उलट्या आणि जुलाब झालेल्या ५ ते ७ विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार करून १२ तास निरक्षणासाठी हॉस्पीटलमध्येच ठेवण्यात आले. तर उर्वरित विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. सध्या सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली.
मेसमध्ये वापरण्यात आलेल्या गुलाबजामच्या पावडरमुळे विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या गुलाबजाम पावडरची पाकिटे तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आली आहेत. विद्यापीठ प्रशासनातर्फे झालेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे डॉ. कराड यांनी सांगितले.