वडापाव आणि बिस्कीटांवर विद्यार्थी काढताहेत दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 07:00 AM2019-07-16T07:00:00+5:302019-07-16T07:00:05+5:30
राज्यभरातल्या ग्रामीण भागामधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था असावी याकरिता पालिकेचे तत्कालीन नगरशासक बी. पी. मौर्य यांनी डॉ. आंबेडकर वसतीगृह उभारले.
- लक्ष्मण मोरे
पुणे : महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या असंवेदनशीलतेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना चक्क वडापाव आणि बिस्कीटे खाऊन दिवस काढावे लागत आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्षभरापासून पैसेच जमा होत नसल्याचे समोर आले आहे. खानावळीसाठी दिल्या जाणाऱ्या पैशांची बिले ऑडिटच्या नावाखाली दोन-दोन महिने अदा केली जात नसल्याने विद्यार्थ्यांचा मनस्ताप वाढला आहे. शिक्षणाच्या ओढीने राज्यभरामधून लाखो विद्यार्थी विद्येचे माहेरघर असलेले पुणे शहर गाठतात. राज्यभरातल्या ग्रामीण भागामधून आलेल्या विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था असावी याकरिता पालिकेचे तत्कालीन नगरशासक बी. पी. मौर्य यांनी डॉ. आंबेडकर वसतीगृह उभारले. त्यावेळी १२० विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या वसतीगृहामध्ये नव्या इमारती उभ्या करुन ही क्षमता ४०० पर्यंत वाढविली. याठिकाणी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवून विद्यार्थ्यांसाठी खानावळही सुरु केली होती. परंतू, कालांतराने जेवणाच्या दर्जावरुन झालेल्या वादामधून ही खानावळ बंद केली. त्यानंतर विद्यार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपये खानावळीकरिता देण्यात येऊ लागले. परंतू, हे पैसेही वेळेत जमा होत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तीन महिन्यांपासून वसतीगृह प्रमुख (रेक्टर) पद रिक्त आहे. यापूर्वीच्या वसतीगृह प्रमुखांना बढती मिळाल्यानंतर नव्या प्रमुखांची तसेच निवासी वसतीगृह प्रमुखाचीही नेमणूक केलेली नाही. त्यामुळे येथील सुविधांवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी माणूसच उपलब्ध नसल्याने कुचंबना होऊ लागली आहे. काही दिवसांपुर्वी दोन लेखनिकांची याठिकाणी नेमणूक केली आहे. शासन निर्णयाप्रमाणे १०० विद्यार्थ्यांमागे एक वसतीगृह प्रमुख असणे आवश्यक आहे. परंतू सध्या ४०० विद्यार्थी असूनही एकाही प्रमुखाची नेमणूक केलेली नाही. वसतीगृहामध्ये स्वच्छता, देखभाल, विद्यार्थ्यांच्या समस्या आदींसाठी कर्मचाºयांची आवश्यकता आहे. परंतू, त्यासाठी कोणत्याही स्वरुपाचा आकृतीबंधच तयार केलेला नाही. २०१४ च्या सेवा प्रवेश नियमावलीमध्ये त्याचा समावेश केला नाही. सध्या केवळ एका सुरक्षारक्षकावर येथील सुरक्षेचा भार आहे. याठिकाणी तीन सुरक्षा रक्षक नेमलेले असून एक दिवसपाळीला आणि एकाची नियुक्ती रात्रपाळीला असते. तर तिसरा सुटीच्या दिवशी बदली कामगार म्हणून येतो. त्यामुळे येथील सुरक्षेचाही प्रश्न व्यवस्थित हाताळला जाण्याची आवश्यकता आहे.महापौर बंगला व घोले रस्ता क्षेत्रिय कार्यालयाच्या अगदी समोर असलेल्या या वसतीगृहाच्या अवस्थेकडे येथे येणाऱ्या अधिकाऱ्यांचे लक्ष जात नाही. एकीकडे ह्या आलिशान वास्तू उभ्या आहेत, तर दुसरीकडे वसतीगृहामध्ये सुविधांची वानवा आहे.
............