‘मॉक टेस्ट’कडे विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:10 AM2021-04-06T04:10:15+5:302021-04-06T04:10:15+5:30
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रथम सत्राच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (मॉक टेस्ट) घेतली जात आहे. ...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रथम सत्राच्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (मॉक टेस्ट) घेतली जात आहे. परंतु, अनेक विद्यार्थ्यांनी या मॉक टेस्टकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. सोमवारी १ लाख १० हजार १७ विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा देणे अपेक्षित होते. मात्र, केवळ ६८ हजार ४७० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे.
पुणे विद्यापीठातर्फे पुणे, अहमदनगर व नाशिक या तिन्ही जिल्ह्यांमधील सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांची प्रथम सत्राची परीक्षा १० एप्रिलपासून घेतली जाणार आहे. ऑनलाइन परीक्षा देण्यापूर्वी विविध विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवस परीक्षेच्या सरावाची संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे प्रत्यक्ष परीक्षा देताना कोणत्या अडचणी येऊ शकतात याची माहिती विद्यार्थ्यांना होणार आहे. मात्र, ४० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली नसल्याची माहिती समोर आले आहे. सोमवारी विज्ञान आणि अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची सराव परीक्षा झाली. त्यात पदवी अभ्यासक्रमाच्या ८८, हजार ८६६, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या १८ हजार २३५ आणि पदविका अभ्यासक्रमाच्या २ हजार ९१६ विद्यार्थ्यांनी परीक्षा देणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात पदवीच्या ५४ हजार १०७ पदव्युत्तर पदवीच्या १२ हजार ५२७ आणि पदविका अभ्यासक्रमाच्या १ हजार ८३६ विद्यार्थ्यांनी सराव परीक्षा दिली.
सोमवारी १ लाख १० हजार १७ विद्यार्थ्यांमधील केवळ ६८ हजार ४७० विद्यार्थ्यांनी परीक्षेचा सराव केला आहे. सुमारे ३५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सराव परीक्षेचा पासवर्ड न मिळणे, ई-मेल आयडी व मोबाईल रजिस्टर्ड न होणे अशा अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षा सुरळीतपणे पार पडणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
--
उत्तरे सेव्ह होत नाही
सराव परीक्षा सुरळीतपणे घेतली, असा दावा विद्यापीठातर्फे केला जात आहे. परंतु, या परीक्षेत दरम्यान सोडवलेल्या प्रश्नांची उत्तरे सेव्ह होत नसल्याचे काही विद्यार्थ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यापीठाने या प्रक्रियेत सुधारणा करावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.
--
इंटरनेटबाबत अडचणी; टाइमर मात्र चालूच
सोमवारी विद्यापीठाची सराव परीक्षा सुरू झालेली.मात्र, हेल्पलाईन क्रमांकावर कॉल केल्यावर कॉल उचलला गेला नाही. उत्तर देताना पुढील प्रश्नावर क्लिक केल्यावर वेळ लागत आहे. इंटरनेटबाबत अडचणी आली तरीही टाइमर चालूच राहत आहे.
- मधुकर कुलकर्णी, विद्यार्थी