शासकीय तंत्रनिकेतनमधील पास झालेले विद्यार्थी सहा महिन्यानंतर नापास ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:10 AM2021-01-25T04:10:33+5:302021-01-25T04:10:33+5:30
राहुल शिंदे पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) विद्यार्थ्यांचा निकाल सरासरी पध्दतीने जाहीर करण्यात आला. त्यात विद्यार्थ्यांना ...
राहुल शिंदे
पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर येथील शासकीय तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) विद्यार्थ्यांचा निकाल सरासरी पध्दतीने जाहीर करण्यात आला. त्यात विद्यार्थ्यांना 40 गुणांना उत्तीर्ण असताना 35 गुण मिळाले, तरी उत्तीर्ण झाल्याचे दाखविले. मात्र, तब्बल सहा महिन्यानंतर निकालात बदल करून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
शासन निर्णयानुसार अंतिम वर्षाचे विद्यार्थी वगळता उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल सरासरी पध्दतीने जाहीर करण्यात आला. त्यानुसार शासकीय पॉलिटेक्निकमधील विद्यार्थ्यांचा निकाल आॅगस्ट महिन्यात प्रसिध्द झाला.परंतु, परीक्षेत 40 गुणांना उत्तीर्ण असताना 35 गुणांना उत्तीर्ण असल्याची माहिती सॉफ्टवेअरमध्ये भरली गेली. या तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थ्यांच्या निकालासमोर 35 गुण व उत्तीर्ण (पी)असा शेरा आला. प्रत्यक्षात 40 पेक्षा कमी गुण असणा-या विद्यार्थ्यांच्या निकालासमोर अनुत्तीर्ण (एफ) शेरा येणे अपेक्षित होते. मात्र, निकाल प्रसिध्द केल्यानंतर ही बाब तंत्रनिकेतनच्या परीक्षा विभागाच्या लक्षात आली. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी निकाल पाहिला होता. तसेच आपण उत्तीर्ण आहोत असा समज त्यांनी करून घेतला होता. परंतु, परीक्षा विभागाला आपली चूक लक्षात येण्यास काही महिन्यांचा कालावधी लागला. ही चूक लक्षात आल्यावर त्यांनी निकाल रद्द केला. तसेच याबाबत संकेतस्थळावर व महाविद्यालयाच्या आवारात नोटीस प्रसिध्द केली.
शासकीय तंत्रनिकेततर्फे कोरोना काळात अंतिम वर्षाच्या सुमारे 1 हजार 150 विद्यार्थ्यांची तब्बल 170 विषयांची परीक्षा आॅनलाईन पध्दतीने घेण्यात आली. त्यातील सुमारे 150 विषयांचा निकाल 100 टक्के लागला. अंतिम वर्षाचा निकाल चांगला लागला असला तरी अंतिमपूर्व वर्षाच्या निकालात चुकीच्या पध्दतीने जाहीर झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकदा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण कसे दाखवता,असा प्रश्न पालकांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र,एका तांत्रिक चुकीमुळे निकालही चुकला असे तंत्रनिकेतनच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे.
-------------------------------------
काही कारणास्तव चुकीचा निकाल प्रसिध्द झाल्यास सहा महिन्यांपर्यंत त्यात दुरूस्ती करता येते,असे स्वायत्त महाविद्यालयाच्या नियमावलीत स्पष्ट केले आहे.त्यामुळे तांत्रिक कारणामुळे तंत्रनिकेतनकडून सुधारित निकाल प्रसिध्द केला. परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना येत्या मार्च महिन्यात परीक्षा देता येणार आहे.
-डॉ.विठ्ठल बांदल, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, पुणे