विद्यार्थ्यांना छापील स्वरूपातील पाठ्यपुस्तके देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:14 AM2021-04-30T04:14:00+5:302021-04-30T04:14:00+5:30
पुणे : कोरोनामुळे मागील वर्षीच बालभारतीने पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व पाठ्यपुस्तके ऑनलाइन पद्धतीने मोफत उपलब्ध करून दिली आहेत. तसेच ...
पुणे : कोरोनामुळे मागील वर्षीच बालभारतीने पहिली ते बारावीपर्यंतचे सर्व पाठ्यपुस्तके ऑनलाइन पद्धतीने मोफत उपलब्ध करून दिली आहेत. तसेच जून महिन्यापर्यंत पुस्तक छपाईचे काम पूर्ण करून विद्यार्थ्यांना छापील स्वरूपातील पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याचा बालभारतीचा प्रयत्न आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुटीनंतरच विद्यार्थ्यांच्या हातात कोरी करकरीत पुस्तके मिळणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पहिली ते नववी व अकरावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय घेतला. परंतु, अद्याप विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला नाही. मात्र, परीक्षा न देता विद्यार्थी पुढील वर्गात गेले आहेत. त्यामुळे आता आपल्या पाल्याने पुढील वर्गाचा अभ्यासक्रम सुरू करावा, अशी पालकांची अपेक्षा आहेत. तसेच अद्याप राज्य शासनाने उन्हाळ्याची सुटी जाहीर केलेले नाही. तसेच निकाल कोणत्या दिवशी विद्यार्थ्यांना वितरित करावा, याबाबतचाही निर्णय घेतलेला नाही.
सीबीएसई बोर्डाचे शैक्षणिक वर्ष एप्रिल महिन्यापासून सुरू होते. त्यामुळे सध्या या शाळा सुरू आहेत. परंतु, एसएससी, एचएससी बोर्डाच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष जून महिन्यात सुरू होते. या दृष्टीनेच बालभारतीतर्फे पुस्तक छपाईचे नियोजन केले आहे. परंतु, काही न्यायालयीन प्रक्रियेमुळे सध्या पुस्तक छपाईचे काम बंद ठेवले आहे. मात्र, पुस्तक छपाईला दीड ते दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे सर्व छपाई नियोजित वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास बालभारतीच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
--
मागील वर्षी छपाई केलेली अनेक पुस्तके कोरोनामुळे शिल्लक आहेत. तसेच काही पुस्तकांची छपाई नुकतीच केली आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे सध्या छपाई बंद आहे. परंतु, पुढील दीड ते दोन महिन्यांमध्ये सर्व पुस्तकांची छपाई पूर्ण करून विद्यार्थ्यांच्या हातात छापील पुस्तके दिली जातील.
- दिनकर पाटील, संचालक, बालभारती