विद्यार्थी वाहतुकीसाठी सवलतीत मिळणार बस
By admin | Published: July 24, 2015 04:07 AM2015-07-24T04:07:13+5:302015-07-24T04:07:13+5:30
शाळांच्या मागणीनुसार विद्यार्थी वाहतुकीसाठी कराराने देण्यात येणाऱ्या बसच्या दरात २५ टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणे : शाळांच्या मागणीनुसार विद्यार्थी वाहतुकीसाठी कराराने देण्यात येणाऱ्या बसच्या दरात २५ टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बैठकीत घेण्यात आला. तसेच या बस उपलब्ध करण्याचे धोरण एक महिन्याच्या आत निश्चित करावे, असे निर्देशही पीएमपी प्रशासनाला देण्यात आले आहेत.
पीएमपीकडून शाळांना विद्यार्थी वाहतुकीसाठी कराराने बस उपलब्ध करून दिली जाते. त्याकरिता ६५ रुपये प्रतिकिमी दर आकारला जातो. शालेय विद्यार्थ्यांना बस पासमध्ये ७५ टक्के सवलत देण्यात आली आहे. मात्र, शाळांना विद्यार्थी वाहतुकीसाठी दिलेल्या बसला कोणतीच सवलत दिली जात नव्हती. त्यामुळे करारानुसार बस घेण्यास फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. या पार्श्वभूमीवर शाळांना ६५ रुपये प्रतिकिमी दरामध्ये २५ टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी दिली.
मागील वर्षी केवळ १८ शाळांनी करारानुसार बस पीएमीपीकडून भाड्याने घेतल्या होत्या. कराराच्या दरात २५ टक्के सवलत देण्यात आल्यामुळे शाळांकडून प्रतिसाद वाढण्याची शक्यता आहे. शाळा कराराने बस घेण्याकरिता अर्ज करीत होत्या. मात्र, विद्यार्थी वाहतुकीची जबाबदारी घेण्यास त्यांच्याकडून नकार दिला जात होता. यामुळे अडचणी निर्माण होत होत्या. शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावलीनुसार विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अनेक निकषांचे पालन करावे लागते, त्याची जबाबदारी शाळांनी घेणे आवश्यक आहे. त्याबाबतही बैठकीमध्ये चर्चा झाली. करारानुसार बस भाड्याने घेणाऱ्या शाळांनी वाहतुकीची जबाबदारी घेणे अपेक्षित आहे, असे महापौरांनी स्पष्ट केले.