अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना मिळणार प्रश्नांचा नमुना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 11:10 AM2020-10-10T11:10:37+5:302020-10-10T11:11:13+5:30
प्रत्येक विषयाचे २० प्रश्न शनिवारपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत.
पुणे : तृतीय वर्षाच्या आॅनलाईन परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ प्रश्नांचे स्वरूप समजण्यासाठी नमुना प्रश्न उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रत्येक विषयाचे २० प्रश्न शनिवारपासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर पाहता येणार आहेत. या प्रश्नांसोबत उत्तरांचे पर्याय मात्र दिले जाणार नाहीत.
पुणे विद्यापीठाकडून दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांची आॅनलाईन पध्दतीने सराव परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असल्याने प्रश्नांचे स्वरूप समजण्यासाठी ही सराव परीक्षा घेतली जात आहे. मात्र या परीक्षेमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारण्यात आले असल्याने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. प्रश्नांचे स्वरूप कळावे यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाचा स्वतंत्र प्रश्नसंच देण्याची मागणी केली होती. पण प्रशासनाने ही मागणी मान्य केली नाही. मात्र प्रत्येक विषयाचे २० नमुना प्रश्न संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. शनिवारी दुपारपर्यंत हे प्रश्न पाहता येतील. या प्रश्नांपैकी काही प्रश्न मुख्य परीक्षेतही विचारले जाऊ शकतात. त्यामुळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले नाहीत.
दरम्यान, मागील दोन दिवसांत २ लाख ८३ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी सराव परीक्षेत सहभाग घेतला आहे. आॅनलाईन परीक्षेसाठी सुमारे १ लाख ९० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी १ लाख ३६ हजार विद्यार्थ्यांनी सरावासाठी लॉग इन केले. गुरूवारी १ लाख २८ हजार तर शुक्रवारी १ लाख ५५ हजार विद्यार्थ्यांनी सराव केला, अशी माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली.