विद्यार्थ्यांना मिळणार अभ्यासासाठी पाठ्यपुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:12+5:302021-07-02T04:09:12+5:30

पुणे : शाळा सुरू झाल्यानंतर १५ दिवसांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांच्या पुरवठ्याचा मोहिमेचा शालेय ...

Students will get textbooks for study | विद्यार्थ्यांना मिळणार अभ्यासासाठी पाठ्यपुस्तके

विद्यार्थ्यांना मिळणार अभ्यासासाठी पाठ्यपुस्तके

Next

पुणे : शाळा सुरू झाल्यानंतर १५ दिवसांनी समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासनाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या मोफत पाठ्यपुस्तकांच्या पुरवठ्याचा मोहिमेचा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते गुरुवारी बालभारती येथे शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे उशिरा का होईना, पण विद्यार्थ्यांना कोरोना काळात अभ्यास करण्यासाठी पुस्तके मिळणार आहेत.

पाठ्यपुस्तक पुरवठा मोहीम शुभारंभ कार्यक्रमास बालभारतीचे संचालक दिनकर पाटील, प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक दिनकर टेमकर, बालभारतीचे नियंत्रक विवेक गोसावी आदी उपस्थित होते.

शासनाच्यावतीने दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत शाळेच्या पहिल्या दिवशी पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जाते. यावर्षी पाठ्यपुस्तकांच्या छपाईसाठी आवश्यक असणाऱ्या कागदासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे पुस्तक छपाईस विलंब झाला. न्यायालयीन प्रकरण निकालात निघाल्यानंतर आता पुस्तक छपाई व पुरवठा सुरळीत सुरू झाला. प्रथम टप्प्यात राज्याच्या दुर्गम भागात पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे. उर्वरित ठिकाणी देखील लवकरच पाठ्यपुस्तके उपलब्ध होतील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

-------

पीडीएफ फाइल उपलब्ध

पाठ्यपुस्तक मंडळाने पहिली ते बारावीच्या सर्व पुस्तकांच्या पीडीएफ फाईल बालभारतीच्या वेबसाईटवर मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत. आतापर्यंत सुमारे १ कोटी ७८ लाख पुस्तके विद्यार्थ्यांनी डाऊनलोड केली आहेत, असे गायकवाड यांनी सांगितले.

----------------

शिक्षणमंत्र्यांचा अचानक दौरा

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बालभारती येथे अचानक पाठ्यपुस्तक पुरवठा शुभारंभाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे शिक्षण अधिकारीही चक्रावून गेले. गेल्या काही दिवसांपासून शिक्षण क्षेत्राशी निगडित असणारे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यात दहावी-बारावी परीक्षेचा निकाल, शाळांकडून मनमानी पद्धतीने आकारले जाणारे शुल्क, आरटीई प्रवेशावर संस्थाचालकांनी घातलेला बहिष्कार आदी प्रश्नांचा समावेश आहे. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे टाळण्यासाठीच वर्षा गायकवाड यांनी अचानक कोणतीही कल्पना न देता येथील कार्यक्रमास हजेरी लावली का? अशी चर्चा शिक्षण वर्तुळात सुरू आहे.

Web Title: Students will get textbooks for study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.