विद्यार्थ्यांची हजेरी नियमितपणे तपासणार
By Admin | Published: May 7, 2017 03:30 AM2017-05-07T03:30:44+5:302017-05-07T03:30:44+5:30
खासगी क्लासेसशी करार करून विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थितीत सवलत दिली जात असल्याच्या प्रकाराची शिक्षण विभागाने गांभीर्याने
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खासगी क्लासेसशी करार करून विद्यार्थ्यांना वर्गात उपस्थितीत सवलत दिली जात असल्याच्या प्रकाराची शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नियमितपणे तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन करून हजेरीचा आढावा घेतला जाईल, अशी माहिती सहायक शिक्षण संचालिका मीनाक्षी राऊत यांनी दिली.
जेईई किंवा इतर प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी अनेक विद्यार्थी खासगी क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. या परीक्षा तसेच अकरावी व बारावीची संपूर्ण तयारी या क्लासेसमध्ये करून घेतली जाते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील वर्गात बसण्यासाठी सवलत मिळावी, यादृष्टीने काही खासगी क्लासेसने पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील काही महाविद्यालयांशी करार केले आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना केवळ दोन दिवस महाविद्यालयात यावे लागणार आहे. इतर दिवशी उपस्थिती नसली तरीही चालणार आहे. त्याबदल्यात विद्यार्थ्यांकडून महाविद्यालये हजारो रुपये घेत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघडकीस आले आहे. याबाबतचे ‘शिक्षण विभागाला ठेंगा दाखवत गैरहजेरीसाठी सशुल्क सवलत’ हे वृत्त शनिवारी प्रसिद्ध झाले आहे. या प्रकाराची दखल शिक्षण विभागानेही घेतली आहे.
याविषयी बोलताना राऊत म्हणाल्या, ‘‘येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता अकरावी व बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा नियमितपणे आढावा घेतला जाईल. त्यासाठी स्वतंत्र पथके करून महाविद्यालयांना भेटी दिल्या जातील. महाविद्यालयांमध्ये अचानक जाऊन तपासणी केली जाईल. या तपासणीमध्ये सातत्य राखले जाईल. नियमानुसार वर्गात विद्यार्थ्यांची उपस्थिती असलीच पाहिजे. तसेच ज्या महाविद्यालयांना बायोमेट्रिक हजेरीसाठी यंत्रणा बसविणे शक्य आहे, त्यांनी अशी यंत्रणा बसविणे अपेक्षित आहे. त्याचीही माहिती घेतली जाणार आहे.
अनुपस्थिती आढळून आल्यास तक्रार करा...
वर्गामध्ये विद्यार्थ्यांची अनुपस्थिती आढळून आल्यास किंवा एखाद्या महाविद्यालयामध्ये अकरावी-बारावीचे वर्ग भरत नसल्यास त्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे कुणालाही तक्रार करता येईल. राज्य शासनाने प्रत्येक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये तक्रार पेटी बसविण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या तक्रार पेटीतही याबाबतची तक्रार टाकता येईल, असे आवाहन सहायक शिक्षण संचालिका मीनाक्षी राऊत यांनी केले.
प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन संबंंधित महाविद्यालयाची अचानक तपासणी केली जाईल. या तपासणीत विद्यार्थ्यांची सातत्याने अनुपस्थिती आढळून आल्यास संबंधित महाविद्यालयावर कारवाई केली जाईल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.