MPSC: विद्यार्थ्यांनो राज्यात लवकरच स्पर्धा परीक्षेच्या १५ हजार जागा भरणार; दत्तात्रय भरणेंचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 13:46 IST2022-04-26T13:46:19+5:302022-04-26T13:46:37+5:30
एमपीएससी अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये

MPSC: विद्यार्थ्यांनो राज्यात लवकरच स्पर्धा परीक्षेच्या १५ हजार जागा भरणार; दत्तात्रय भरणेंचे आश्वासन
इंदापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेला गती आली आहे. वर्षभरात रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ज्या प्रमाणे तुमच्या आई वडिलांना तुमची काळजी आहे. तशीच मलाही आहे. एमपीएससी अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये. या वर्षात खूप परीक्षा द्यायच्या असल्याने केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहन सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना केले.
अर्हम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा यांचे संयुक्त विद्यामाने आयोजित स्पर्धा परीक्षा वास्तव, भवितव्य आणि दिशा या विषयावर संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमीत्ताने दत्तात्रय भरणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी प्रशासकीय अधिकारी महेश झगडे, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.शैलेश पगारिया, अहिल्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश शेंडगे, महेश बडे, किरण निंभोरे उपस्थित होते.दत्तात्रय भरणे यांचे हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
आठ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू
''कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात भरती प्रक्रिया लांबली होती. मात्र आता राज्यातील सर्वच विभागातील रिक्त जागांची माहिती घेण्यात आली आहे. त्यानुसार सुमारे १५ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यापैकी ८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. राहिलेल्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. परीक्षांबाबत कोणताही गोंधळ आता होणार नाही. वर्षभरात सर्व रिक्त पदे भरली जाऊन नेमणुकाही दिल्या जाणार असुन मोठा भाऊ या नात्याने आपल्यासाठी काम करणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.''