भीमाशंकर परिसराचा योग्य अभ्यास करा, अन्यथा धोका कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:09 AM2021-07-26T04:09:48+5:302021-07-26T04:09:48+5:30
पुणे : मावळात ३६ तासांत ५०० हून अधिक मिमी पाऊस झाला. भीमाशंकर देवस्थान पाण्यात गेले. अतिवृष्टी, ढगफुटी असे अनेकांनी ...
पुणे : मावळात ३६ तासांत ५०० हून अधिक मिमी पाऊस झाला. भीमाशंकर देवस्थान पाण्यात गेले. अतिवृष्टी, ढगफुटी असे अनेकांनी त्याला नाव दिले. पण माणसांनी केलेल्या नुकसानीचे हे परिणाम आहेत. मर्यादेपेक्षा अतिक्रमण अधिक झाले की, पूर येतोच. निसर्ग दयाळू नाही. भीमाशंकर परिसरातील बांधकामे, तिथले लोक, पर्यटन या सर्वांचा अभ्यास करून नियोजन करावे, अन्यथा भविष्यात दरडी कोसळणे, पूर येणारच, अशी माहिती भूजलतज्ज्ञ उपेंद्र धोंडे यांनी दिली.
काही महिन्यांपूर्वीच मंदिरानजीकच्या दोन विहिरी (कुंड) स्वच्छता केल्या आहेत. त्यातील पाण्याचे/झऱ्याचे उगम उत्तर-पश्चिमेकडून आहेत. त्या दिशेलाच वर डोंगर माथ्याचा भाग सपाट करून तिथे दोन मोठे कृत्रिम तलाव केलेले आहेत. याच दिशेला खाली जी घरे आहेत तिकडे डोंगरभिंतीची माती सुटी झालेली आहे. काही प्रमाणात डोंगराला तडे-भेगाही दिसून आल्या होत्या. निश्चितच उत्तर-पश्चिमेकडून जे पण काही विकासाच्या नावाखाली सुरु राहील, त्याचा परिणाम खाली मंदिराजवळ होणार आहे. अगदी तोच परिणाम म्हणजे परवा पाण्याने मंदिराला विळख्यात घेतले, असे धोंडे म्हणाले.
भिमाशंकर मंदिराचे तिर्थक्षेत्र म्हणून असलेलं महत्त्व आणि भविष्यात अशा ठिकाणी दुर्घटना घडल्यास प्रशासनाची संभाव्य नाचक्की होईल. त्यामुळे आताच योग्य उपाय करायला हवेत, असे धोंडे यांनी सांगितले.
——————————————-
सर्व बाजूने प्रशासनाने विचार करावा
22 जूलै रोजी रात्री मंदिर परिसरास पुराच्या पाण्याने वेढा दिला. मंचर-भिमाशंकर रस्त्यावर मोठी दरड कोसळली. मंदिर परिसरात राहणारी लोकसंख्या आणि वर्तमान स्थिती पाहता प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. किमान पावसाळ्यात लोकांना स्थलांतरित तरी करायला हवे. या परिसराची संपूर्ण तांत्रिक तपासणी व्हायला हवी. हे सगळे वेळेतच घडावे तर जीव वाचतील अन्यथा दुर्घटना घडून गेल्यावर होणाऱ्या अभ्यासाचा काहीच उपयोग होणार नाही, असे धोंडे म्हणाले.
—————————————————-
या ठिकाणी मुळातच दाट वस्ती आहे, शिवाय तिथीनुसार होणारी गर्दी वेगळीच आहे. या गर्दीसाठी लागणारी व्यवस्था म्हणून खोल पाया लागणारी नवी बांधकामे तितकिशी नाहीत. जी आहेत ती जुनी आहेत. परंतु नवीन कामे करता ती धोकादायक ठरतील यात शंका नाही. देवस्थान विकासकामे सुरु असताना पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवणे म्हणजे "आगीशी खेळच होय" याचा विचार झाला पाहिजे.
- उपेंद्र धोंडे, भूजलतज्ज्ञ
———————————