विद्यापीठात भटक्या-विमुक्त समाजावर संशोधन करण्यासाठी अध्यासन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 12:05 AM2020-11-26T00:05:58+5:302020-11-26T00:06:24+5:30
राज्यात भटका विमुक्त समाज मोठ्या प्रमाणावर असून त्यांच्या संस्कृती परंपरा आणि बोलीभाषेवर अध्याप सखोल अभ्यास झालेला नाही.
पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठात भटक्या-विमुक्त समाजावर अभ्यास व संशोधन करण्यासाठी अध्यासन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत घेण्यात आला. तसेच अध्यासन आराखडा तयार करण्यासाठी सात सदस्य समिती गठित करण्यात आली.
पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेनेमध्ये विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुस्थितीत पार पडल्यामुळे व्यवस्थापन परिषदेतर्फे कुलगुरू प्र-कुलगुरू व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच विद्यापीठातील विविध विभागांमधील अभ्यासक्रमाच्या शुल्कात यंदा कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी भटक्या विमुक्त समाजावर अभ्यास करण्यासाठी अध्यासन स्थापन करण्याचा ठराव मंजूर झाला.
राज्यात भटका विमुक्त समाज मोठ्या प्रमाणावर असून त्यांच्या संस्कृती परंपरा आणि बोलीभाषेवर अध्याप सखोल अभ्यास झालेला नाही. राज्य शासनातर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या बैठकीत पुणे विद्यापीठाने याबाबत अध्यासन स्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा ,असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.तसेच व्यवस्थापन परिषदेसमोर अध्यासन स्थापन करण्यासंदर्भातील ठरावावर चर्चा केली. अध्यासन स्थापन करण्यासंदर्भातील अहवाल देण्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.व्ही. बी. गायकवाड, डॉ.संजय चाकणे, डॉ.सुधाकर जाधवर, डॉ. सुनील भणगे, गणराज्य संघाच्या अध्यक्ष सुषमा अंधारे, प्रा. मिलिंद कांबळे या सात जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे.