अभिजात नृत्यासाठी हिंदुस्थानी संगीत, भाषा आणि नृत्य यांचा अभ्यास हवा : डॉ. सुचेता भिडे-चापेकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 02:39 PM2019-04-17T14:39:38+5:302019-04-17T14:43:45+5:30

शाळांमध्ये अभिजात नृत्य कलेविषयीची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. 

Study of Indian Music, Language and Dance for Classical Dance: Dr. Sucheta Bhide-Chapekar | अभिजात नृत्यासाठी हिंदुस्थानी संगीत, भाषा आणि नृत्य यांचा अभ्यास हवा : डॉ. सुचेता भिडे-चापेकर 

अभिजात नृत्यासाठी हिंदुस्थानी संगीत, भाषा आणि नृत्य यांचा अभ्यास हवा : डॉ. सुचेता भिडे-चापेकर 

Next
ठळक मुद्देनृत्याचा प्रसार करण्यासाठी स्वतंत्र वाहिनी किंवा दूरदर्शनवर पाऊणतासाचा कार्यक्रम असावा

डॉ. सुचेता भिडे-चापेकर हे भारतीय अभिजात नृत्यपरंपरेतील एक अग्रगणी असे नाव. भरतनाट्यम शैलीतील नृत्यप्रकारामध्ये निपुणता मिळवत नृत्यकलेचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी सुचेताताईंनी कलावर्धिनी संस्थेची स्थापना करून आयुष्यभर नृत्याचा प्रचार व प्रसार करण्याचे बहुमूल्य कार्य केले. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे त्यांना नुकताच मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाल्याबददल सुचेताताईंशी  ''लोकमत'' ने साधलेला हा संवाद.
नम्रता फडणीस
*   मास्टर दीनानाथ मंगेशकर हा प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुरस्कार जाहीर झाल्याबददल काय भावना आहेत?
-पुरस्कार म्हणजे आपण काहीतरी चांगले काम करत आहोत याची खूण असते. हा पुरस्कार आपल्याला मिळेल असे मनातून कधीच वाटले नाही. हदयनाथ मंगेशकर सत्तरीनिमित्त आयोजित कार्यक्रम सोहळ्याला आले होते. माझे काम पाहून तेव्हाच त्यांनी हा पुरस्कार देण्याची मला घोषणा करून टाकली होती. त्यापूर्वी त्यांनी माझे काम विशेष पाहिले नव्हते. त्यांना ते जाणवले. हदयात घर करून ठेवावा असा हा पुरस्कार आहे. 
* मंगेशकर कुटुंबियाबदद्ल काय वाटते?
-मंगेशकर कुटुंबीय एक आदर्श कुटुंब आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सर्व भावडांना बरोबर घेऊन आयुष्याचा प्रवास केला. अडीअडचणींचा सामना केला. त्यांच्या आयुष्यातून खूप काही घेण्यासारखे आहे. ते एक विलक्षण कुटुंब आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लतादीदींचा फोन आला. त्यांनी शुभेच्छा दिल्या,तेव्हा खूप आनंद झाला. त्या स्वत: पुरस्कार सोहळ्याला येत नाहीत. पण  हा पुरस्कार त्यांच्याकडून मला मिळावा अशी माझी इच्छा आहे.  त्यांचा आशीर्वाद मिळावा. 
*  संगीत नाटकांशी जवळून संबंध कधी आला ?  नृत्यशैलीमध्ये नाट्यपदांची गुंफण करण्याच्या अभिनव प्रयोगाविषयी काय सांगाल?
-नृत्यगंगा हा हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित पहिला कार्यक्रम केला होता. त्याची सुरूवात नाट्यगीतांपासून झाली होती. तेव्हा दीनानाथ मंगेशकर यांचीच नाट्यपदे मी ऐकली होती. त्यांच्या तीस वर्षांपूर्वीच्या कँसेट आजही माझ्याकडे आहेत. त्यांची  भावबंधनमधील कठीण कठीण किती,  गुंजारमाला ही पदे मी केली होती. त्यानंतर त्यांच्याविषयी अनेक गोष्टी वाचल्या. हिंदुस्थानी संगीतामधून भरतनाट्यम अशी संकल्पना घेऊन अनेक कार्यक्रम केले.
* नाट्यसंगीत आणि नृत्याची सांगड कशाप्रकारे घातलीत?
- अभिजात नृत्य कळायचे असेल हिंदुस्थानी संगीत, त्याची भाषा आणि नृत्याची भाषा समजावी लागते. पारंपारिक भरतनाट़्यम भाषा तामिळ, तेलगु आणि संगीत कर्नाटक आणि नृत्याची भाषा ही प्रतिकात्मक असते. लोकांना वरकरणी वेशभूषा वगैरे चांगली वाटते पण नृत्य पोहोचविणे अवघड असते. पारंपारिक नाट्यपदे ही संगीतावर आधारित आहेत. विषय, पद आणि चाल माहिती आहे. परिस्थितीमधून हावभाव फुलवून मांडले. वेगवेगळ्या संचारी दाखवून नाट्यपदे सादर केली. रसिकांना हा वेगळा प्रयोग आवडला. वेगवेगळ्या काळातील नाट्यपदे घेऊन कार्यक्रमांची निर्मिती केली. 
* भरतनाट्यममध्ये इतर कलाकारांकडून असे प्रयोग होत आहेत का?
-भरतनाट्यममध्ये असे प्रयोग विशेष होणार नाहीत. कारण त्यासाठी हिंदुस्थानी संगीताच्या भाषेचा अभ्यास असावा लागतो.माझ्या शिष्या असे प्रयोग करीत आहेत. 
* संगीत महोत्सवांच्या माध्यमातून जशी  कानसेन घडण्याची प्रक्रिया घडते, तसे नृत्यकलेद्वारे अभिजात प्रेक्षक घडविले जात आहेत का?
- असे अभिजात प्रेक्षक घडत आहे. नृत्याच्या कार्यक्रमांना तिकिट लावून प्रेक्षक गर्दी करीत आहेत. कार्यक्रमही खूप वाढले आहेत. आम्ही काही कलाकारांनी मिळून शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेची निर्मिती केली आहे. त्यामाध्यमातून दहा दिवस वेगवेगळ्या ठिकाणी 60 ते 70 कार्यक्रम होणार आहेत. प्रेक्षक वर्ग नक्कीच वाढला आहे. कार्यक्रम हाऊसफुल्ल होत आहेत. 
* नृत्यकलेचे संवर्धन होण्यासाठी कोणते प्रयत्न होणे अपेक्षित आहेत असे वाटते?
- नृत्याचा प्रसार करण्यासाठी एक स्वतंत्र वाहिनी किंवा दूरदर्शनवर एखादा पाऊणतासाचा कार्यक्रम असावा असे वाटते. हे माध्यम तळागाळात पोहोचणारे आहे त्यातून आपली संस्कृती पोहोचेल. शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्थेच्या माध्यमातून अनेक प्रोजेक्ट विचाराधीन आहेत. त्यामध्ये नृत्यकलेसाठी स्वतंत्र मंच असावा, वृत्तवाहिनी असावी याचा पाठपुरावा करणार आहोत. याशिवाय शाळांमध्ये अभिजात नृत्य कलेविषयीची जाणीव करून देण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत. 
----------------------------

Web Title: Study of Indian Music, Language and Dance for Classical Dance: Dr. Sucheta Bhide-Chapekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.