"अभ्यास समजतो अन् मित्रमैत्रिणींशी हाेते भेट", विद्यार्थी म्हणतात; ऑफलाइन शाळांची मज्जाच...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 03:11 PM2022-06-27T15:11:02+5:302022-06-27T15:11:19+5:30
तब्बल दाेन वर्षांनी शाळा ऑफलाइन सुरू झाल्याने विद्यार्थी आनंदित
पुणे : जगभर अनपेक्षितपणे काेराेनाचा फैलाव झाला अन् २०२०मध्ये महाराष्ट्रातील शाळाही बंद पडल्या. ते शैक्षणिक वर्ष मुलांचे घरीच गेले. त्यानंतर जून महिन्यात शाळा सुरू झाल्या; पण ऑनलाइनच. त्यामुळे मुलांना घरात बसून माेबाइलवर तासंतास क्लास अटेंड करावे लागले. मित्र-मैत्रिणींची भेट नाही की शाळांच्या मैदानावर खेळायला मिळाले नाही. तब्बल दाेन वर्षांनी शाळा ऑफलाइन सुरू झाल्याने विद्यार्थी आनंदित झाले आहेत. ऑफलाइन शाळांची मज्जाच न्यारी, अशी भावना विद्यार्थी व्यक्त करत आहेत.
शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचे दुसरे जग असते. शहरातील सर्व शाळा १५ जून राेजी प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शाळांचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेला आहे. काेराेना संकटकाळात दाेन वर्ष शाळा बंद राहिल्याने विद्यार्थी शाळेला ‘मिस’ करत हाेते. आता शाळा ऑफलाइन सुरू झाल्याने शिक्षक, मित्रांची प्रत्यक्ष भेट हाेत आहे. मैदानावर खेळायला मिळते. इतर कलाही जाेपासता येत आहे. गेल्या शैक्षणिक वर्षाचे शेवटचे काही महिनेवगळता मागील दाेन वर्ष विद्यार्थ्यांना माेबाइलवर शिक्षण घ्यावे लागले. ऑनलाइन शिक्षणात डाेळ्यासमाेर शिक्षक नाहीत की साेबतीही नाहीत. त्यामुळे अभ्यास जणू त्यांच्यासाठी कंटाळवाणा झाला हाेता; आता सर्व पूर्वीसारखे झाल्याने विद्यार्थी जाम खुश झाले आहेत.
''मला ऑफलाइन शाळा आवडते; कारण वर्गात समोरासमोर शिकवले गेल्याने लवकर समजते. ऑनलाइनमध्ये विषय फार समजत नव्हते. तसेच शाळा सुरू झाल्याने मैदानावर खेळायला मिळते. संगीताच्या तासात तबला वाजवायला मिळतो असे समर्थ बेंडळ (इयत्ता आठवी, सिल्व्हर क्रेस्ट स्कूल, सिंहगड रोड) याने सांगितले.''
''ऑफलाइन शिकवलेले सर्व समजते. ऑनलाइनमुळे अभ्यासात लक्ष लागत नव्हते, कंटाळा यायचा. मोबाइलचेही वेड लागते. ऑफलाइन शाळांमुळे मैत्रिणींना, शिक्षकांना भेटता येते असे नयन जोगदंड (इयत्ता नववी, नूमवी गर्ल्स हायस्कूल) म्हणाला आहे.''
''ऑफलाइन शाळेत सगळ्यांसमोर अभ्यास करायला मिळतो. शिक्षक सांगतात ते कळते. सगळ्यांसमोर खेळ खेळायला मिळते. टिफीन शेअर करता येतो. ऑनलाइनमध्ये कंटाळा यायचा व क्लास सुरू असताना लक्ष लागायचे नाही असे आर्या पवार (इयत्ता नववी, ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूल) हिने सांगितले.