स्त्रीरोगतज्ज्ञविना सुरू आहे उपजिल्हा रुग्णालय, गर्भवती महिलांची होतेय हेळसांड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 12:57 AM2019-03-22T00:57:42+5:302019-03-22T00:58:17+5:30
इंदापूर शहरातील ग्रामीण शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे महिन्यातून शंभरापेक्षा जास्त गर्भवती महिलांची प्रसूती होते, त्यातील अनेक महिलांची शस्त्रक्रिया करावी लागते. तरी, गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी मात्र सोलापूर आणि पुण्याला जावे लागत आहे.
इंदापूर - इंदापूर शहरातील ग्रामीण शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे महिन्यातून शंभरापेक्षा जास्त गर्भवती महिलांची प्रसूती होते, त्यातील अनेक महिलांची शस्त्रक्रिया करावी लागते. तरी, गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत. त्यामुळे येथील गर्भवती महिलांना प्रसूतीसाठी मात्र सोलापूर आणि पुण्याला जावे लागत आहे.
इंदापूर तालुक्यातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात तालुक्यातील १४४ खेडेगावांतून महिला रुग्ण येतात. या रुग्णांची आरोग्याची तपासणी उपजिल्हा रुग्णालयात होते खरी; पण प्रसूतीची वेळ आल्यानंतर त्या महिलांना उपचारांसाठी पुणे व सोलापूर येथे रवाना करण्यात येते. अगदी शेवटच्या वेळी रुग्णांना शंभर-दीडशे किलोमीटर लांब जाणे त्यांच्या जिवावर बेतते. कित्येक वेळा तर प्रसूतीच्या रुग्णांना त्या ठिकाणी पोहोचण्यास तीन ते चार तासांचा कालावधी लागत असल्याने अनेक महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेतच झाल्याच्या घटनाही यापूर्वी घडलेल्या आहेत.
इंदापूर तालुक्यातून दर महिन्याला सरासरी १२० पेक्षा जास्त महिलांची प्रसूती केली जाते. मात्र, दीड महिन्यापूर्वी अचानक येथील एका स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांनी राजीनामा दिला. त्यामुळे रुग्णालयाची गरज ओळखून रुग्णालय अधीक्षक डॉ. राजेश मोरे यांनी तत्काळ एक खासगी स्त्रीरोगतज्ज्ञांची नियुक्ती केली. मात्र, गेल्या आठवडाभरापासून त्यांचाही पत्ता नाही. त्यांचा फोनही नॉट रिचेबल आहे. त्याआधी इंदापूर शहरातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शिवाजी खबाले यांची शासकीय रुग्णालयात पूर्वी, गर्भवती महिलांची प्रसूती व शस्त्रक्रिया करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काही अडचणी आल्याने त्यांनी या वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा दिला व स्वत:च्या हॉस्पिटलमध्येच काम करणे पसंत केले.
परिचारिकाच करतात गर्भवतींची तपासणी
रुग्णालयात गर्भवती महिलांची नियमित तपासणी करण्यासाठी प्रत्येक आठवड्यात बुधवार हा दिवस ठरवण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी गर्भवती महिला रुग्णांची तपासणीची संख्या जास्त असते. मात्र, रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने परिचारिका यांनाच गर्भवती महिलांची तपासणी करावी लागत आहे. त्यामुळे गर्भवती महिलांना पोट घेऊन तासन् तास तपासणीच्या रांगेत उभे राहावे लागते.
भूलतज्ज्ञांकडून गर्भवतींची तपासणी
दर बुधवारी गर्भवती महिलांची तपासणी केली जाते. मात्र, स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध नसल्यानेच त्यांची तपासणी चक्क येथील भूलतज्ज्ञ डॉ. एकनाथ चंदनशिवे आणि डॉ. चोपडे यांच्यामार्फत केली जाते.
सुमारे दीड ते दोन महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून येथे प्रसूतिगृह बांधण्यात आले होते. मात्र, स्त्रीरोगतज्ज्ञाअभावी हे प्रसूतिगृह धूळ खात पडून आहे.
इंदापूरमध्ये बीएएमएस व एमडी डॉक्टर उपलब्ध आहेत; पण त्यांना प्रसूती व शस्त्रक्रिया करण्यासाठी घेण्यास परवानगी नाही. केवळ एमबीबीएस व डीजीओ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता असते. इंदापूरमधील त्या डॉक्टरांना नियुक्त करण्यास विचारले; मात्र शासकीय दवाखान्यातील असुविधा व नागरिकांच्या तक्रारींना वैतागून आमच्याकडे डॉक्टर टिकत नाहीत, हे वास्तव आहे.
- डॉ. राजेश मोरे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, इंदापूर
उपलब्ध डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांमार्फत रुग्णांना परिपूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टराची गरज आहे; मात्र ते नसल्याने काम बंद झालेले नाही. काही दिवसांत स्त्रीरोगतज्ज्ञाची नेमणूक करण्यात येईल.
-डॉ. अशोक नांदापूरकर, पुणे जिल्हा शल्यचिकित्सक