शेजाऱ्याची वीज वापरल्याप्रकरणी कारवाई करणाऱ्या उपअभियंत्याला धक्काबुक्की; एकावर गुन्हा दाखल
By नम्रता फडणीस | Published: December 27, 2023 05:37 PM2023-12-27T17:37:26+5:302023-12-27T17:39:33+5:30
याप्रकरणी धमप्पाल पंडित (वय-५०, रा. हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे....
पुणे :वीजबिलांच्या थकबाकीमुळे घरगुती वीजपुरवठा खंडित केल्यानंतर शेजारून परस्पर अनधिकृत वीज वापरल्याप्रकरणी कारवाई करीत असताना महावितरणचे अभियंता व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करीत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी धमप्पाल पंडित (वय-५०, रा. हडपसर) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेश दौंडकर (वय-४७, रा. थेऊर फाटा, कुंजीर वाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
ही घटना मंगळवारी (दि. २६) दुपारी अडीचच्या सुमारास घडली. महावितरणच्या मुळशी विभागातील उरूळी कांचन उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता धम्मपाल पंडित हे सहकारी जनमित्र सुनील शिंदे, अंचल बागडे, अश्विनी गोरे, किरण झेंडे यांच्यासह थेऊरफाटा, कुंजीरवाडी येथे थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करीत होते. यामध्ये आंबेकरवस्ती येथील लता मोहन दौंडकर यांच्या नावे असलेल्या घरगुती वीजबिलाची ९ हजार १५० रुपयांची थकबाकी होती व वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र वीजजोडणीची तपासणी केली असता या ग्राहकाकडे शेजारच्या वीजग्राहकाकडून अनधिकृत वीजपुरवठा घेतल्याचे आढळून आले.
या वीजचोरीबाबत स्थळपाहणी अहवाल तयार करण्यात आला. यासंदर्भात संबंधित वीजग्राहकांना माहिती देत असताना गणेश दौंडकर याने तेथे येऊन स्थळपाहणीचा अहवाल फाडून टाकला. तसेच माझ्या दारात येण्याचा काय संबंध असे म्हणत उपकार्यकारी अभियंता पंडित व सहकाऱ्यांना
धक्काबुक्की केली. याप्रकरणी महावितरणकडून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गणेश दौंडकर विरुद्ध कलम ३५३, ३२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.