विवाहित असताना 'लिव्ह इन रिलेशनशिप' पोलीस उपनिरीक्षकाला भोवली; अपर पोलीस आयुक्तांनी केले निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 12:55 IST2021-03-02T12:54:23+5:302021-03-02T12:55:19+5:30
हा पोलीस उपनिरीक्षक हडपसर पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत. त्यांचे यापूर्वी लग्न झाले आहे.

विवाहित असताना 'लिव्ह इन रिलेशनशिप' पोलीस उपनिरीक्षकाला भोवली; अपर पोलीस आयुक्तांनी केले निलंबित
पुणे : गडचिरोलीमध्ये कर्तव्यावर असताना मागासवर्गीय तरुणीशी प्रेमसंबंध ठेवून तिच्याबरोबर डिसेंबर २०१९ पासून पुण्यात 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहणे एका पोलीस उपनिरीक्षकास चांगलेच भोवले आहे. अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांनी त्याला निलंबित केले आहे.
हा पोलीस उपनिरीक्षक हडपसर पोलीस ठाण्यात नेमणूकीला आहेत. त्यांचे यापूर्वी लग्न झाले आहे. ऑगस्ट २०१९ पूर्वी ते गडचिरोलीला असताना एका तरुणींबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले. तिला त्याने पुण्यात आणून हडपसर येथे भाड्याने घर घेऊन दिले. तेथे ते डिसेंबर २०१९ पासून लव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात या तरुणीचा सविस्तर जबाब नोंदविला असून त्यात त्यांच्यात वारंवार शारीरिक संबंध आले. एक वेळा गर्भपातदेखील करण्यात आलेला आहे. लग्नास नकार दिल्याने त्यांच्यात वारंवार भांडणे होत आहेत. या तरुणीने भरोसा सेलमध्ये तक्रार अर्ज दिला होता. या ठिकाणी दोघांचे समुपदेशन करण्यात आले. त्यावेळी तरुणीने महिला दक्षता समितीच्या सदस्यांसमोर नंतर कोणतीही तक्रार नसल्याचे लिहून दिले आहे.
विवाहित असताना तरुणीसाेबत अनैतिक प्रेमसंबंध ठेवणे, तिला गर्भपात करावयास भाग पाडणे हे वर्तन पोलीस दलाची समाजातील प्रतिमेस बाधा आणणारे असल्याने या पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.