बैलगाडा शर्यती सुनावणी तातडीने घेण्यासाठी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:14 AM2021-08-19T04:14:01+5:302021-08-19T04:14:01+5:30
अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्यावतीने बैलगाडा मालकांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मंगळवारी मुंबई येथे भेट घेतली होती. त्यावेळी मागील ...
अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटनेच्यावतीने बैलगाडा मालकांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची मंगळवारी मुंबई येथे भेट घेतली होती. त्यावेळी मागील तीन वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात असलेल्या केससंदर्भात कोणतीही सुनावणी झाली नसल्याचे वळसे पाटील यांच्या निदर्शनास बैलगाडा मालकांनी आणून दिले होते. त्यावेळी वळसे पाटील यांनी तातडीने सरकारी वकील ॲड. सचिन पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला व राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात तत्काळ अर्ज करून बैलगाडा शर्यती संदर्भातील सुनावणी व्हावी, अशी सूचना वळसे-पाटील यांनी केली होती. आज सकाळी सरकारी वकील ॲड. सचिन पाटील यांनी सुप्रीम कोर्टात विनंती अर्ज करून बैलगाडा शर्यती संदर्भातील सुनावणी तत्काळ व्हावी, अशी मागणी केली आहे. यासंदर्भातील पाठपुरावा करून न्यायालयाने सुनावणी लवकर घ्यावी यासाठी विनंती करणार असल्याची माहिती ॲड. सचिन पाटील यांनी दिली. बैलगाडा मालक बाळासाहेब आरुडे म्हणाले, बैलगाडा शर्यतीवर बंदी असल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. गेले अनेक दिवस शर्यती होत नसल्याने ग्रामीण भागातील अर्थकारणावर परिणाम झाला आहे. असे असले तरी बैलगाडा मालक बैलांची काळजी पोटच्या मुलाप्रमाणे घेत आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतल्यानंतर आता चालना मिळाली आहे. असे बाळासाहेब आरुडे यांनी सांगितले. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी अर्ज दाखल करण्यात आल्याने बैलगाडा मालकांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान यापूर्वी दोन वेळा राज्य सरकारने या प्रकारचा अर्ज केला होता. मात्र कोविडमुळे त्यावेळी न्यायालयाने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. आज केलेल्या अर्जावर न्यायालय कोणता निकाल देणार याबाबत उत्सुकता आहे.