महापालिका आयुक्तांच्या दक्षता पथकाचा अहवाल सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:12 AM2021-03-25T04:12:48+5:302021-03-25T04:12:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिका आयुक्तांनी नियुक्त केलेल्या दक्षता पथकाचा अहवाल नुकताच सादर केला आहे. यामध्ये कुठल्याही विकासकामांची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिका आयुक्तांनी नियुक्त केलेल्या दक्षता पथकाचा अहवाल नुकताच सादर केला आहे. यामध्ये कुठल्याही विकासकामांची प्रत्यक्षात पाहणी न करताच कामांचे मोजमाप आणि दर्जा प्रमाणित करून लाखो रुपये शुल्क दिले जात असल्याचा ठपका ठेवला आहे़
विशेष म्हणजे, महापालिकेच्या विकासकामांचे ऑडिट करण्यासाठी नियुक्त केलेल्या थर्ड पार्टीच वादात सापडली असून, या पथकाने केलेल्या पाहणीमध्ये कोणत्या विकासकामांसाठी कोणता थर्ड पार्टी ऑडिटर नेमला आहे याची माहितीच संबंधित कामावरील कनिष्ठ अभियंत्यांपासून उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यालाही माहिती नसल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, या पथकाकडून आत्तापर्यंत झालेल्या कामांच्या कागदपत्रांपासून तपासणी करून, प्रत्यक्ष कामांच्या ठिकाणी भेट देऊनही पाहणी केली आहे. तद्नंतर पथकाने आयुक्तांकडे सादर केलेल्या अहवालातून समोर आलेल्या माहितीमुळे, नजीकच्या काळात ठेकेदारांपासून, थर्ड पार्टी ऑडिटर आणि अभियंते यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे़
यावर्षी कोरोनामुळे महापालिकेचे उत्पन्न घटले असताना राज्य शासनाच्या आदेशानुसार ४० टक्केच कामे करण्यात आली आहेत. कोरोना आणि लॉकडाउनमुळे वर्षभर कामे न झाल्याने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात मोजक्या कामांनाच परवानगी देण्यात आली़ पण ही परवानगी दिली तरी, आयुक्तांनी वित्तीय समितीचे सर्व अधिकार स्वत:कडे घेतले होते़ तसेच शेवटच्या टप्प्यात १९ मार्चपर्यंतच कामांची वर्क ऑर्डर आणि २५ मार्चपर्यंत बिले सादर करण्याची मुदत जाहीर केली असून गुरूवारी म्हणजे आज याची मुदत संपत आहे.
--
दक्षता पथकाच्या पाहणीत एका ठिकाणी ड्रेनेज लाईनचा प्रवाहच उताराच्या विरूद्ध दिशेने असल्याचे निदर्शनास आले असून, ड्रेनेजचे पाणी चेंबरमधून घरांमध्ये शिरेल, अशा पद्धतीने काम झाल्याचेही समोर आले आहे़ त्यामुळे अशाप्रमारे अन्य कामांमध्येही झालेल्या गोंधळामुळे अनेक ठेकेदार, अभियंते गोत्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे़