जिहे कठापूरसाठी ३०० कोटींचा प्रस्ताव सादर करा
By admin | Published: January 5, 2016 10:41 PM2016-01-05T22:41:38+5:302016-01-05T22:41:38+5:30
विजय शिवतारे : कृष्णा खोरे विकास महामंडळाला सूचना
सातारा : ‘जिहे कठापूर उपसा सिंचन योजना कार्यान्वीत करून नेर व अांधळी तलावात पाणी सोडण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यास काही कालावधी लागत असल्याने सुप्रमापेक्षा वाढीव खर्च रक्कम ३०० कोटी खासबाब म्हणून खर्च करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात यावा,’ अशा सूचना पालकमंत्री विजय शिवतारे यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाला (पुणे) दिल्या.
जिहे कठापूर उपसा सिंचन योजना कार्यान्वीत करण्याबाबत पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील विधानभवन मधील दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीस आमदार शशिकांत शिंदे, रणजित देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक रा. ब. घोटे, जलसंपदा विभागाचे मुख्यअभियंता के. एम. शाह, पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, उभारणी मंडळ कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता आ. एन. कोष्टी, जलसंपदा विभागाचे उपसचिव आर. ए. उपासनी, वित्त विभागाचे अवर सचिव एन. व्ही. पाटील, उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, जिहे कठापूर उपसा
सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. गायकवाड आदी उपस्थित होते.
नेर उपसा सिंचन योजनेचे वितरण हौद नजीकच्या डोंगरावर उच्च पातळीवर घेऊन बंदीस्त कालवा करून संपूर्ण लाभ क्षेत्र
ठिबक सिंचनाद्वारे विकसित करण्याच्या अनुषंगाने सर्वेक्षण व अंदाजपत्रक सहा महिन्यांत तयार करावे, कोरेगाव तालुक्यातील पूर्व भागातील एकंबे, खिरखिंडी, शेल्टी, रामोशीवाडी इत्यादी गावांना प्रवाही पद्धतीने पाणी देण्याबाबतचा प्रस्ताव प्राथमिक सर्वेक्षण करून सहा महिन्यांत सादर करावा, कोरेगाव तालुक्यातील वसना, वांगणा योजनेमधून तलावामध्ये पाणी सोडण्याबाबत प्रस्ताव तीन महिन्यांत सादर करावा, असे निर्णयही यावेळी घेण्यात आले. यावेळी अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)